रविवार, २९ डिसेंबर, २०१३

रसिक

मी माझ्या निवांत समयी
टिव्ही रेडियोच्या
गोंगाटापासून दूर
नेहमीच्या अभ्यासिकेत
हळव्या मनाने काढून
वाचतोय ही
जिप्सी मधली पाडगावकरांची कविता
कितव्यांदा ..
ते आठवत नाही..
... तरीही ती नवीनच वाटते
आनंद होऊन पुन्हा मनात दाटते

तश्याच कविता
लिहून जाव्यात वाटते मला
ज्या कविसंम्मेलने
किंवा गीतांमधे गाजणार नाहीत
कदाचित...
पण माझ्यासारखाच कोणी
एक रसिक
घेऊन बसेल उद्या
त्याच्या खास जागेत
सर्व गोंगाटांपासून दूर
.. पुन्हा एकदा वाचण्यासाठी
अगणीत वेळा वाचून झाली असेल
तरीही...
पुन्हा मनापासून..

~ तुष्की, नागपूर
२९ डिसेंबर २०१३, १९:३०

रविवार, २२ डिसेंबर, २०१३

पाऊस

व्याकुळल्या बीजासाठी
तू चैतन्याचा हात
रूजण्याच्या महोत्सवाची
तू गंधमयी सुरवात

तू त्याच्या स्नेहसुधेच्या
अभिषेकाचे आवर्तन
बुजणाऱ्या तृणपात्याला
तू जगण्याचे आमंत्रण

तू आठवणींचा साठा
हळवी भासांची भुरभुर
तू ओढ सागर गहिरी
भेटाया उत्कट आतुर

~ तुष्की
नागपूर, २२ डिसेंबर २०१३, १७:५०

गुरुवार, १९ डिसेंबर, २०१३

चेहऱ्याचा चंद्र

(साचा: विल'नॅल)

तुझे मोकळे मोकळे केस ओले
पहाटेस आली रया उत्सवाची
तुला पाहताना मन चिंब झाले

जपण्यास क्षण केवढे मिळाले
अरे दृष्ट काढा अश्या वैभवाची
तुझे मोकळे मोकळे केस ओले

एका क्षणी भान हरपून गेले
सर कोसळावी जशी पावसाची
तुला पाहताना मन चिंब झाले

इंद्रधनू थेंब थेंब सजलेले
काय ऐट केसांमधल्या थेंबाची
तुझे मोकळे मोकळे केस ओले

उर पोखरती मदनाचे भाले
गोरीमोरी झाली दशा माणसाची
तुला पाहताना मन चिंब झाले

चेहऱ्याचा चंद्र केस ढग झाले
धुंद चांदण्यात मजा जगण्याची
तुझे मोकळे मोकळे केस ओले
तुला पाहताना मन चिंब झाले

~ तुष्की
नागपूर, १९ डिसेंबर २०१३, २१:४०

रविवार, ८ डिसेंबर, २०१३

अज्ञात कवी

मी लिहेन केव्हातरी
एक कविता
जी लोकांच्या मनाचा
वेगळाच ठाव घेईल

चिरून काढेल जी
वाचकाचे अंतरंग
आणि ती कविताच
माझी ओळख होऊन जाईल

ही कविता मला घेऊन जाईल
वाचकप्रसिद्धीच्या ढगात
माझ्या लिखाणाचा ठरेल ती
वळण बिंदू!!

हिच्या प्रभावामुळेच
मग लोक माझ्या
जुन्या कवितांनाही वाचू लागतील
समजून घेऊ लागतील, दादही देतील

ती कविता माझ्याने
लिहून होई पर्यंत
कदाचित मी एका मोठ्या जगासाठी
अज्ञातच राहीन.

अश्याच अनेक अज्ञात कवींप्रमाणे
ओळख नसलेला कवी.

[कणा कवितेने मला कुसुमाग्रजांचे वेड लावले, प्रेम म्हणजे सेम असतं या कवितेने पाडगावकरांचे वेड लावले, बघ माझी आठवण येते का आणि गारवा ने सौमित्र चे वेड लावले, पुसणारं कोणी असेल तर या ओळींनी चंद्रशेखर गोखलेंच्या प्रेमात पाडले, इतकेच मला सरणावर जाताना कळले होते या ओळींनी मी सुरेश भटांवर फिदा झालो, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता या ओळीने ग्रेस च्या प्रेमात पडलो, श्रावणमासी ने बालकवी, चाफा बोलेना ने भारातांबे, अरे संसार संसार ने बहिणाबाईंना ओळखायला लागलो, अशी किती उदाहरणे देऊ जिथे काही ओळींनी कवीच्या प्रेमात पडायला झाले आणि मग त्या कवीच्या सगळ्या कविता शोधून वाचायचे वेड लागले]

~ तुष्की
नागपूर
८ डिसेंबर २०१३, २३:००

गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१३

कविता

एक कविता आहे
मनात दडून बसलेली

तिची वाट पाहत
मी कल्पनेचे दार उघडेच ठेवतो
भावनांना डचमळू देतो
आणि शब्दांचे झरे वाहत राहू देतो

जे जे सुचेल ते
लिहीत जातो कागदावर
मग वाचतो ती कविता
छान असते ती
पण जिची वाट पाहतोय
ती अजून आलेली नसते

पण मला माहिताय
कोणत्यातरी कल्पनेचे बोट धरून
भावनेच्या कोणत्यातरी पदरात दडून
शब्दांच्या कोणत्यातरी ओघात
ती नक्की येईल
मला भेटायला

मला लिहित राहायला हवे
तिच्यासाठी तरी
मला लिहित राहायलाच हवे.

~ तुष्की
नागपूर
२८ नोव्हेंबर २०१३, २१:२०

मंगळवार, १० सप्टेंबर, २०१३

अशी सावळी आहेस

(छंद: पादाकुलक)

हृदयामध्ये ठसावी, अशी सावळी आहेस
रणरण शांत व्हावी, अशी सावळी आहेस

सावळ्या रंगांमधेही, कितीकिती तरी छटा
त्यातही उठून यावी, अशी सावळी आहेस

गोड सहज सोज्वळ, तुझ्या रंगाचाया बाज
जिथे थबकेल कवी, अशी सावळी आहेस

स्वप्नामधून पाहिली, किती तरी तरूणांनी
जीवनात तीच हवी, अशी सावळी आहेस

तुष्की एकटाच नाही, तुझ्या रंगावर फिदा
देव यक्ष आस लावी, अशी सावळी आहेस

~ तुष्की
नागपूर, १० सप्टेंबर २०१३, ०७:५०

सोमवार, २६ ऑगस्ट, २०१३

जगावे कसे

(छंद: घनाक्षरी)

नको होईल जगणे, वीट येईल स्वतःचा
तरी पुढे जात रहा, माघार घेऊ नको

अन्याय जिंकेल जेव्हा, न्याय दिसणार नाही
लढत रहा जिद्दीने, लाचार होऊ नको

प्रश्न छळतील जेव्हा, उत्तरे ना मिळतील
प्रकाशाचा दूत हो तू, अंधार होऊ नको

जगणे मिळाले तसे, जगावे कसे कळेल
कसे होईल ही भीती, मनात ठेऊ नको

~ तुष्की
नागपूर, २६ आगस्ट २०१३, ००:००

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१३

कविता

(छंदः रोहिणी)

पाणावेल पापणी
जिला वाचताक्षणी
कविता लिहाया घ्यावी
हृदयाची लेखणी

मुक्त असे असूदे
छंद वाली असूदे
कशीही असली तरी
मनामधे ठसू दे

मनातून असावी
आरपार घुसावी
वाचताना शहारून
यावे अशी डसावी

अनुभव हळवे
किंवा स्वप्न हिरवे
शब्दाशब्दातून क्षण
मोहरून निघावे

~ तुष्की
नागपूर, २३ आगस्ट २०१३, १०:००

शुक्रवार, २ ऑगस्ट, २०१३

नागपुरची सकाळ

चौकचौकात पोह्यांचे ठेले
तरूण विद्यार्थी तिथे दाटलेले
कुणी गाड्या काढून दूर दूर
मस्त पोहे खाण्यास ते हजर

कुठे पेपरचे ढीग मोजणारे
कुणी पेपर ते घरी टाकणारे
कुणी जाताना रात्र पाळिहून
थांबलेला पोह्यास त्या बघून

संस्कृताच्या बातम्या घरी चाले
कुठे भक्ती गीतास उत आले
आजिआजोबा देव पुजे साठी
निघालेले रस्त्यात फुलांसाठी

रस्त्यावरती मार्निंग वॉक वाले
धावणारे डिएड करणे वाले
रस्त्यांच्या कडेस बाकावर
जेष्ठ नागरिक गप्पांसाठी हजर

कुठे शाळेच्या तयारीत जागे
अवघे घरदारच मुलांच्या ते मागे
युनिफार्म डब्बा बूट बाटली पण
काही सुटले नाही ना हेच दडपण

वॅन शाळांच्या मुलांनी भरून
पिवळे डब्बे फिरतात बावरून
जीम मधल्या त्या ट्रेडमिल वरून
कुणी चाले शरिरास घाबरून

पहाटेचे क्लासेस दहावीचे
लोट स्कुटीचे आणि बाईक्सचे
कुणी कालनीच्या छोट्या पार्कातून
हा हा हा हा हासती भरभरून

दूधवाल्यांची फटफटी मधेच
पेपर टाकुन कुणी जातोय लगेच
कार पुसणारे दिवसाला आडून
कुणी पेपर वाचे चहा घेऊन

ज्यास दूकान उघडायचिच घाई
हजर आमचे कित्येक सिंधी भाई
इडली डोसा घेऊन गल्लीतून
कुणी अन्ना जातो घरावरून

ठराविक त्या चौकांच्या मधून
ठिय्या रेजा कुली येती जमून
हातावरती घेऊन पोट रोज
ठिय्यावरचे थांबणे लागलेच

जाग येते शहरास या प्रमाणे
भेट देते ते दिवसाला नव्याने
रात्र मागे टाकून शहर येई
दिवसभरच्या कामास सज्ज होई

~ तुष्की
नागपूर, ०२ आगस्ट २०१३, ००:००

शनिवार, २७ जुलै, २०१३

निराळा

रंगांमध्ये निराळा सतत प्रिय मला सावळा रंग वाटे
रंगाने या प्रियेची वदन मधुरता वाढते रम्य होते
माझ्यासाठी प्रभूने अढळ बनवला रंग हा शामवर्णी
प्रेमाने खास त्याने अविरत श्रमुनी कोरली गोड लेणी

हास्याने लुब्ध व्हावे सहजच हसता प्रेयसी सावळी ती
जेव्हा गाली सजावी अवखळ गहिरी साजरीशी खळी ती
वाटे जेव्हा उदासी क्षणभर बघणे आणते प्राण देही
वाहे वारा सुगंधी दिवसभर कसा भासश्वासात राही

वर्णू गोडी किती मी लिहुन थबकलो मावतो गोडवा ना
शब्दांमध्ये बसे ना रूसुनच बसला केवढा दुष्ट कान्हा
या श्रीरंगा वरी मी मनभर लिहिणे वाटते नित्य व्हावे
जेव्हा जेव्हा लिहावे परत परत मी सावळीला लिहावे

~ तुष्की
नागपूर, २७ जुलाई २०१३, २०:४५
(वृत्त: स्रग्धरा .. उदा: ध्यायेदाजानु बाहू धृतशरधनुषं बद्ध पद्मा सनस्थं )

बुधवार, २४ जुलै, २०१३

टिटवी ला टिवटिव करते

ही टिटवी का टिवटिव करते?
ही टिटवी का टिवटिव करते?

काळजाची होई घालमेल
काय रात्रीच्या गर्भी असेल
डोळा लवतोय चिंता मनाला
समजावू मी कसे कुणाला
प्रीत माझ्या मनी हुरहुरते
ही टिटवी का टिवटिव करते?

साज शिनगार बसले सजून
भेटाया तो ना आला अजून
फोनवर भासला त्रासलेला
घोर त्याच्या नसूदे जिवाला
पाल भिंतीवरी चुकचुकते
ही टिटवी का टिवटिव करते?

~ तुष्की
नागपूर, २४ जुलाई २०१३, ०९:३०

शुक्रवार, १२ जुलै, २०१३

ऋण

त्या दिवशी
त्या धुंद मिठीत
तू ओठांचे अर्धेच भास ठेवून गेलेलीस
ते भास घेऊन
मी काळवाटेवर
अजूनही त्याच ग्लानीत जगतो आहे
कोण्या एका वळणावर पुन्हा
आपली भेट होईलच
तुझ्या ओठांचे
ऋण फेडण्यासाठी
हा ध्यास नाही
हा विश्वास आहे
कारण..
दोघांनाही सारखेच वाटणे
इच्छेला विश्वासात बदलत असते

~ तुष्की
नागपूर, १२ जुलाई २०१३, ११:००

पहिला पांढरा केस पाहुन

(रांगोळी घालताना पाहून, ही केशवसुतांची कविता सर्वश्रुत आहे.  त्या काळचे कवी अमूक अमूक करताना पाहून या स्टाईल च्या कविता लिहायचे, तशाच शैलीत आपणही काही लिहावे असे अनेकदा मनात विचार आला होता.  गप्पागटावर स्वाती शुक्ल यांनी एक प्रश्न विचारला त्याच्या अनुषंगाने माझी ही इच्छा आज पूर्ण झाली असे वाटते.)

पहिला पांढरा केस पाहुन

केस पहिला पाहून
शुभ्रधवल रेशमी
वाटे तारूण्याची वेस
पार झाल्याची बातमी

किंवा दूत तो एखादा
आला पुढे सगळ्यांच्या
प्रौढ जाणिवांची शाल
गळा घालण्यास माझ्या

अता अजून येतील
सांगतो तो चिडवून
अनुभवाची मोजणी
होते त्याच्याच पासून

तो आल्याचे दुःख नाही
काय हरवले ना चिंता
सुटला कुणास आहे
काळचक्राचा हा गुंता

स्वागत करतो त्याचे
त्यास देतो मी अभय
पाहुणा मानावा देव
अशी आमची सवय

~ तुष्की
नागपूर, १२ जुलाई २०१३, ०९:३०

शनिवार, ६ जुलै, २०१३

असा बेभान हा वारा

असा बेभान हा वारा
सोबतीला आसंमंत सारा
धुंद रात ही सूर ही मंद हा
मोहतो मना गंध हा
वाटतो हवा बंध हा

(~ निखिल महामुनी)

जाणिवा किती अंतरी दाटल्या
भेटती नव्याने दिशा आतल्या
पान हालते वृक्ष ही डोलती
काजवे जणू चांदण्या खालती
सांगती मला थांब येथे जरा
मांडुनी हा स्मरण पसारा

रातराणीची हाक बागेतुनी
प्रीत वाहते रोमरोमातुनी
श्वास दाटले भास गंधाळले
चित्त लाजले स्पर्ष रोमांचले
लाट होऊनी भेटतो मोगरा
चिंबतो हा हृदय किनारा

आज वाटते धुंद वाऱ्यासवे
मेघदाटुनी रिक्त व्हाया हवे
घट्ट राजसी आठवावी मिठी
काळजामधे साठवावी दिठी
मंद हासतो छेडतो गोजिरा
ओळखीचा कुणी एक तारा

(~ तुष्की
नागपूर, ६ जूलाई २०१३, ११:००)

गुरुवार, २७ जून, २०१३

राधा-कान्हा

सुरातून बासरीच्या, जणू बासरी म्हणते, हवी राधा राधा राधा
अशी बासरी भिनली, अणू रेणू तिचा गाई एक, कान्हा कान्हा कान्हा

पहाटले जग सारे, बघे यमुनेचा काठ
कान्हा होई उतावीळ, पाहे राधेचीच वाट
अडवीन येता राधा,  मनी आनंद दाटतो, रोज बेत रचताना
अशी बासरी भिनली, अणू रेणू तिचा गाई एक, कान्हा कान्हा कान्हा

बासरीने मुग्ध होते, राधा हरखून जाई
कान्हा रोज ठरवून, बासरीची धून गाई
रागावेल गोड राधा, अडवतो रे कशाला, रोज पाणी भरताना
अशी बासरी भिनली, अणू रेणू तिचा गाई एक, कान्हा कान्हा कान्हा

रागावते तरी पुन्हा, कान्हा शोधते चोरून
नाही दिसला तं घोर, हळहळे तिचे मन
त्याची खट्याळ लबाडी, हवीहवीशी वाटते, बासरीत रंगताना
अशी बासरी भिनली, अणू रेणू तिचा गाई एक, कान्हा कान्हा कान्हा

~ तुष्की
नागपूर, २७ जून २०१३, ०७:४५

बुधवार, २६ जून, २०१३

आनंद

दिसतेस दोन क्षण
मग तुझी आठवण
जात नाही मनातून

खळी खेळे गालावर
रूप सावळा बहर
शहारणे अंगभर

विसराया होते जग
तुझा भास जागोजाग
असा उत्कट आवेग

तुझा आठव सुंगंध
क्षण क्षण मुग्ध धुंद
माझे जगणे आनंद

~ तुष्की
नागपूर, २६ जून २०१३, ०९:००

शुक्रवार, २१ जून, २०१३

सावली

कधी सांजवेळी मनाच्या तळाशी
निनावी क्षणांचे धुके दाटते
तुझ्या आठवांच्या मीठीतून घ्यावी
पुन्हा ऊब थोडी असे वाटते

लपेटून घेता तुझ्या आठवांना
उमेदून येते पुन्हा पालवी
उफाळून येते मनातून प्रीती
उरी जागवे नित्य आशा नवी

कधी खिन्न होतो जगाच्या उन्हाने
तुझे भास आयुष्य देती मला
तुझे शब्द येती क्षणांच्या रूपाने
जगावे कसे हेच सांगायला

तुझ्या सावलीचे कवच दाट आहे
जगाची उन्हे बाधती ना मला
तुला आठवोनी पुन्हा सिद्ध होतो
अनेकांप्रती सावली व्हायला

~ तुष्की
नागपूर, २२ जून २०१३, ११:००

शुक्रवार, १४ जून, २०१३

पण

निशा किती झकास पण
कशास मी उदास पण

गुलाब घोर लावतो
सतावतो सुवास पण

असायला असे सुरी
तरी किती मिठास पण

असेल ध्येय भव्य ते
सुखी करे प्रवास पण

कठोर 'तुष्कि' बोल तू
बरी नव्हे मिजास पण

~ तुष्की
नागपूर, १४ जून २०१३, ०९:३०

रविवार, १२ मे, २०१३

जॉली

किस ची जॉली लावल्या पासून
तू कधीच हरली नव्हतीस
वेगवेगळ्या वेळांवर गाठले तरी
हातावर जॉली, हसत दाखवायचीस

तुझा अठरावा वाढदिवस
मी गिफ्ट देऊन म्हणालो जॉली
तू रिकामा हात दाखवलास
डोळ्यात लज्जा, गालावर लाली

~ तुष्की
नागपूर, १२ मे २०१२, १२:००

बद्दी

तू अशी काही चोट लावायचास
की माझे सगळे कंचे
सैरावैरा व्हायचे
तुला बद्दीत कंचे टाकताना
फक्त पाहणे सुद्धा
भान विसरू लावायचे

आज सिग्नल वर
माझ्या एसी कारच्या खिडकीतून पाहिले...
तुला सायकल वरून जाताना...
आता ती खेळातली बद्दी
इतकी मोठ्ठी झाली आहे … … जणू दरीच भासतेय
तुझ्या माझ्या मधली.

~ तुष्की
नागपूर, १२ मे २०१३, १०:१५

शनिवार, ११ मे, २०१३

खूप दिवसांनी..

दिनू च्या हारवलेल्या
कंपॉससाठी जेव्हा
सर्व मित्रांकडून...
उकडलेली बोरे न खायला सांगून
पैसे गोळा केले होते
ती म्हणाली होतीस
भैताड भोंगाच आहेस.

आज तिला कळले
मी करतोय नेतृत्व
माझ्या शोषित बांधवांचे
त्यासाठी शिकतोय कायदा
आणि तंत्रज्ञान
खूप दिवसांनी मला भेटली
आणि म्हणते काय
तू अजूनही भैताड भोंगाच आहेस.

~ तुष्की
नागपूर, ११ मे २०१३, २१:३०

बुधवार, ८ मे, २०१३

वाट

किती वेडापासून तुझी
वाट पाऊन र्‍हायलो मी
लोकं पाहायला लागले आता
येडा दिसून र्‍हायलो मी

चिड चिड चिडून माह्या
डोस्क्याचा होईल गोटा
तू येशील अन म्हनशील
रूमाल सापडत नव्हता

तुझ्यावर वैताग करावा
अशी आधी ईच्छा होईल
पण सावळा गोड चेहरा पाहून
सगळे विसरून जाईल

~ तुष्की
नागपूर, ८ मे २०१३, १०:००

अदा

म्या तिले म्हनलं
तुह्यापातुर खुबसूरत कोनिच न्हाई
तुले भेटाया दिल आतुर व्हतो
भलतीच सरमावली थे
आन मंग हडुच म्हने खुटं बी बोलीव
म्या येका पायावर येतो

म्या म्हनलं आसं कसं
आयला घेऊन येईन
सर्व गावाफुडं मागीन नं तुले
तवा थे नाक उडवत म्हन्ते कशी
मले ठाव व्हतं
तुई हेच अदा तं आवडते मले

~ तुष्की
नागपूर, ८ मे २०१३, ०९:००

रविवार, ५ मे, २०१३

पणती

अंधार वाढेल
दिशांना व्यापेल
भासेल चहूकडे
काहीच दिसत नाही
वाटत असले तरीही
पणती - आशेची तेवत ठेवा

प्रयत्न थकतील
अंदाज चुकतील
हवे तसे ना घडे
सर्व उपाय संपलेत
वाटत असले तरीही
पणती - जिद्दीची तेवत ठेवा

एकटे वाटेल
शांतता जाचेल
डोळ्यात साचे रडे
आपले नाहीच कुणी
वाटत असले तरीही
पणती - प्रीतीची तेवत ठेवा

~ तुष्की
नागपूर, ५ मे २०१३, १२:००

शुक्रवार, १२ एप्रिल, २०१३

देव


मी माझ्या देवाला
एकेरी बोलवेन
पाण्यात घालून ठेवेन
जाब विचारेन आणि कधी तर
विटेवर घराबाहेर उभा ठेवेन

मी माझ्या देवाचे अनेक पदर उलगडेन
तर्कावर घासेन
पाठभेदांवर वाद घालेन

पण...

ज्याला स्वत:च्या देवाला
काही विचारायची हिम्मत नाही
भीतीतून बाहेर पडायचे नाही
किंवा स्वत:च्या देवाबद्द्ल...
काहीच उणे ऐकायचे नाही

त्याने...

माझ्या देवाला जाब विचारायचा नाही
तर्क लावायचे नाहीत
आणि
वाद घालायचा नाही

आपले काचेचे घर सावरत बसायचे
दगड हातात घ्यायचा
विचारही करायचा नाही

~ तुष्की
वरनान हिल्स, ११ एप्रिल २०१३, १७:५०

शनिवार, ६ एप्रिल, २०१३

नक्षत्रांचे दार

डोळे नसले तरी स्वप्ने पाहता येतात
पाय नसले तरीही ध्येये गाढता येतात
हात नसले तरीही आधार देता येतो
माझ्याजवळ तर सगळेच आहे
मी कशाला काय नाही तेच पाहत बसतो

एक दार बंद झाले तरी
नवे दार पुन्हा मिळणार आहे
जमीन संपली असे वाटले तरी
डोक्यावर आकाश अपार आहे
खरंच आकाश माझी सीमा नाहीच
ते तर आव्हान देणारे
खुणावणारे.. नक्षत्रांचे दार आहे.

~ तुष्की
वर्नान हिल्स, ०६ एप्रिल २०१३, ०७:४०

बुधवार, १३ मार्च, २०१३

जन्मठेप

आसुसल्या वचनांची
कोमेजल्या स्वप्नांची
जन्मठेप
जन्मठेप
जन्मठेप माझी

आशा लावी किरण कधी आशा लावी वारे
पंख नाही पाय लुळे आणिक बंद दारे
ठेऊ कुठे देऊ कुणा जगण्याची ओझी
धुमस धुमस श्वासांची
गहिवरल्या भासांची
जन्मठेप
जन्मठेप
जन्मठेप माझी

क्षितिज रोज खुणावते उंचंबळे फार
तुळशीला पाणी माझ्या कोण घालणार
क्षितिजाला भेटू कशी तुळस नवसाची
आहे तसे जगण्याची
दूरून क्षितिज बघण्याची
जन्मठेप
जन्मठेप
जन्मठेप माझी


~ तुष्की
नागपूर, १३ मार्च २०१३

रविवार, १७ फेब्रुवारी, २०१३

घाई

मी बोललो
भरभरून माझ्या मनातले
ते तुझ्या अनुभवाच्या चष्म्यातून
तुझ्यापर्यंत पोचले

मी सांगितले
खडानखडा काहीही न सोडता
तुझ्या मनाने तुला हवे तेवढेच
त्यातून नकळत वेचले

मी आनंदलो
तुला सर्व सांगून
मोकळे झाल्या मुळे
तू ही आनंदलास
तुला सर्व काही मिळाले आहे
असेच वाटल्यामुळे

दोघांच्या संवादात
काहीतरी सुटून गेले बिचारे
निघूनही हवे तसे जे
पोहोचूच शकले नाही
नेहमीच असे होत असणार कारण
मला सांगायची घाई
तुला ऐकायची घाई

~ तुष्की
नागपूर, १७ फेब्रुवारी २०१३, १७:३०

शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१३

गाभारा

अचानक एखादा
रोमहर्षक विचार यावा
तशी तू शिरलीस मनात
मी समजायचा
प्रयत्न करतोय तेवढ्यात
भिनलीस, रोमारोमात

हे आपल्याला
काहीतरी झालंय
झालय काहीतरी सुंदर
सतत जाणवत असतं
मन उचंबळत असतं
झालय पुरतं कलंदर

मुक्त पक्षिणी प्रमाणे
तुझं आसपास असणं
आणि विचारात स्मरणात
माझ्या आत आत असणं
हे झपाटलेलं जगणं
नाही ठाऊक
जाईल कुठे घेऊन
इतकंच कळतय की
मनाचा गाभारा झालाय
तुझ्या विचाराला जागा देऊन

~ तुष्की
नागपूर, १६ फेब्रुवारी २०१३, ००:३०

रविवार, १० फेब्रुवारी, २०१३

ऐक ना

तुला हृदयात दिली जागा भली मोठी
तुला ओवाळती माझ्या नयनांच्या ज्योती
तुझ्यासाठी आले किती चांदण्या माळून
वाटेमधे राजा जाऊ नकोस सोडून
ऐक ना ऐक ना ऐक ना रे माझे
ऐक ना ऐक ना ऐका ना रे माझे

तूच म्हणाला होतास जमेल जमेल
सारे सुरळीत व्हाया मार्ग सापडेल
धीर देत होतास मी आहेना म्हणून
वाटेमधे राजा जाऊ नकोस सोडून
ऐक ना ऐक ना ऐक ना रे माझे
ऐक ना ऐक ना ऐका ना रे माझे

माझ्यासारखी प्रेयसी मिळणार नाही
थांब नाते तोडण्याची नको करू घाई
मार्ग काढू आयुष्याचा दोघेही मिळून
वाटेमधे राजा जाऊ नकोस सोडून
ऐक ना ऐक ना ऐक ना रे माझे
ऐक ना ऐक ना ऐका ना रे माझे

तुझ्या प्रगतीत साथ होईन प्रेमाने
तुला जमतील सारी नवीन आव्हाने
माझी साथ होईल रे नाही अडचण
वाटेमधे राजा जाऊ नकोस सोडून
ऐक ना ऐक ना ऐक ना रे माझे
ऐक ना ऐक ना ऐका ना रे माझे

~ तुष्की
नागपूर, १० फेब्रुवारी २०१३, १६:००