शनिवार, १३ नोव्हेंबर, २०१०

खूप दुखतय रे!

.

बाबा...
बोट दुखतय रे
बाबा
खूप दुखतय रे
.
काय झालं बेटा
बोट भाजल का?
तुला सांगितलंच होत ना
कढईला हात लावू नकोस म्हणून.
.
बाबा
खूप दुखतय रे
हो ग बेटा
मी फुंकर घालून देतो
.
पण ते थोडं दुखणारच बरं
मी पाठीशी आहे
पण तुझं दुःख तुलाच
जगायचय बरं


बाबा...
हृदय दुखतय रे
बाबा
खूप दुखतय रे
.
काय झालं बेटा
तो सोडून गेला?
तुला सांगितलंच होतं ना
तो प्रामाणिक वाटत नाही म्हणून
.
बाबा
खूप दुखतय रे
हो ग बेटा
खांद्यावर डोक टेक रडून घे
.
पण ते थोडं दुखणारच बरं
मी पाठीशी आहे
पण दुःख सहन करायला
शिकायचंय बरं

तुषार जोशी, नागपूर

.

शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०१०

फेयर अॅण्ड लवली आणून देना बाबा मला

.
टिव्ही मधे दाखवती गोरे गोरे रंग
क्रीम कोणते मी लावू गोरे होण्या अंग
मला पण हवा माझा चेहरा चांगला
फेयर अॅण्ड लवली आणून देना बाबा मला


तुझा आहे तोच रंग गोड आहे बेटा
रंग बदलण्याचा नको ग आटापिटा
रंग जो मिळाला जन्मताना आपल्याला
तोच रंग छान रंग तोपण चांगला
बागेमध्ये मोगऱ्याची फुले असती ना
गुलाबाची पण असतात काय हो ना
गुलाबाने मोगरा व्हायचे नसते गं
गुलाबाचे वेगळे सौंदर्य असते गं
आवडतेस तू आहे तशीच आम्हाला
रंग गोरा करण्याचा विचार कशाला


जाहिरात दाखवावी लागतेच त्यांना
खोटी स्वप्ने विकायची असतात ज्यांना
गोरे छान काळे घाण म्हणावे लागते
पुन्हा पुन्हा तेच तेच सांगावे लागते
जगामध्ये सावळेसे बघ किती लोक
गोरे तर थोडे काळे सावळे अधिक
बदकांच्या सौंदर्याची व्याख्या ही वेगळी
चिमणीने तुलनाच करू नाही मुळी
सावळ्या रंगाची गोड गुणाची देखणी
तू आमुची अलौकिक सावळी चिमणी


सावळ्या रंगाचा पोरी अभिमान ठेव
त्याला आवडते तेच बनवतो देव
रंग गोरा रंग काळा आणिक सावळा
सगळेच त्याने बनवले हो ना बाळा?
सगळेच रंग छान असतात बघ
कुणाचाही करू नये द्वेष किंवा राग
लक्ष देऊ नये जर चिडवले कोणी
आपल्याच तालामध्ये म्हणायची गाणी
कितीतरी लोक पुढे भेटतील तुला
भाळतील बघ तुझ्या सावळ्या रंगाला(सावळ्या मुलीची गाणी / तुषार जोशी, नागपूर)
१२ आक्टोबर २०१०, २३:३०
.

गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०१०

जगावी गझल

.

मराठी गझल
प्रभावी गझल

मनी दाटता
म्हणावी गझल

कशाला नशा
करावी गझल

रुजावे तशी
लिहावी गझल

स्मरावी कधी
जगावी गझल

तुषार जोशी, नागपूर

.

सोमवार, २० सप्टेंबर, २०१०

एक कविता करता येईल

.

तुझ्या सुरेख दिसण्यावर
एक कविता करता येईल
तुझ्या मोहक हसण्यावर
एक कविता करता येईल

खळी भरल्या गालावर
एक कविता करता येईल
तुझ्या श्वासांच्या तालावर
एक कविता करता येईल

सावळ्या तुझ्या रंगावर
एक कविता करता येईल
तुझ्या सहज ढंगावर
एक कविता करता येईल

तुझ्या ओठातल्या गाण्यावर
एक कविता करता येईल
तुझ्या डोळ्यातल्या पाण्यावर
एक कविता करता येईल

तुझ्या रोखून बघण्यावर
एक कविता करता येईल
क्षणात ठोका चुकण्यावर
एक कविता करता येईल

तुला सगळे कळण्यावर
एक कविता करता येईल
तुझ्या बेमालूम लपवण्यावर
एक कविता करता येईल

तुझ्या उगाच वगळण्यावर
एक कविता करता येईल
वळून मला छळण्यावर
एक कविता करता येईल

तू असताना असण्यावर
एक कविता करता येईल
तू नसताना नसण्यावर
एक कविता करता येईल

तुषार जोशी, नागपूर
२० सप्टेंबर २०१०, २१:००

मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०१०

पाऊस-कविता

’प्रशांत’नं पाऊस-कवितांच्या खेळाची सुरुवात केली, आणि ’क्रांती”ला खो देऊन कल्पनाशक्तीला मस्त वाव दिला. या खेळाचे त्यानं सांगितलेले नियम खाली दिले आहेत. ’क्रांती’ने तिची साखळी जोडून पुढचा डाव ’प्राजू’,’राघव’,’जयवी’ आणि गोळे काकांच्या हाती तिची सूत्रे दिली. गोळे काकांनी मला व आशाताईंना खो दिले.

मी माझी साखळी जोडून, सईचैताली, अनुराधा आणि शब्दसखा यांना खो देत आहे.

पावसावरील कडव्यांची साखळी का करू नये?

तेव्हा, ब्लॉगबंधु-भगिनींनो, "पाऊस-कविता" पुढे चालवण्यासाठी काही सोपे नियम -

१. शक्यतो छंदबद्ध कडवे तयार करू. अगदीच नाही जमलं तर मुक्तछंद चालेल. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? कविता गुंफ़ायची असल्यामुळे आधीचा कडव्याशी थोडासा तरी संबंध असावा.
२. छंदाचं नाव माहिती असल्यास ते कळवावे. त्याबद्दल माहिती दिली तर छानच. अर्थात नाही दिली तरी चालेल.
३. किमान एक व जास्तीत जास्त चार ब्लॉगबांधवांना खो देता येईल. संबंधित ब्लॉगलेखकास प्रतिसाद देऊन तसे कळवावे.
४. खो मिळाल्यावर ज्याच्या/जिच्याकडून खो मिळाला आहे त्या ब्लॉगलेखकाच्या पोस्टाचा दुवा आपल्या पोस्टात द्यावा व शक्य असल्यास आधीची कडवीही उतरवावीत. तसेच आपण खो स्वीकारल्यावर त्या पोस्टाचा दुवा खो देणाऱ्या पोस्टाच्या प्रतिसादात कळवावा, जेणेकरून आधीच्या लोकांनाही नोंद ठेवता येईल.
५. हे नियम सर्वांच्या सोयीसाठी डकवावे.
६. बस्स. आणखी काही नियम नाही. :-) आता फक्त पाऊस-कविता....

मग करायची‌ सुरुवात?

प्रशांतचे  कडवं - (भुजंगप्रयात छंद)

न क्रोधी असा पावसा रे सख्या रे
तुझी वाट पाहे सखी मी तुझी रे
झणी येउनी वर्ष रे थेंब थेंब
तुझा स्पर्श अंगा करो चिंब चिंब

प्रशांतचा खो -चक्रपाणि, क्रांती, आशाताई, अ सेन मन यांना

क्रांतीचे उत्तर, छंद तोच, भुजंगप्रयात

खुळ्या पावसाला किती आवरू रे?
सरी श्रावणाच्या कशा पांघरू रे?
निळे सावळे मेघ येती छळाया,
सख्या, दूर तू, मी कशी सावरू रे?

क्रांतीताई चा खो प्राजु, राघव, गोळे काका, जयवी यांना

नरेंद्र (गोळे) काकांचे उत्तर, छंद तोच. भुजंगप्रयात!

नको पावसा कोसळू तू असा रे
किती घोर लावून जाशी असा रे
पुरे जाहले, ने पुढे सर्व वारे
जरा राजसा थांब आता कसा रे

गोळे काकांचा खो  आशा जोगळेकर आणि मला

माझी जोड, छंद: भुजंगप्रयात!

कुणी पावसाला म्हणे येत जारे
कुणाला सरीने सजण आठवे रे
कुणी गातसे पावसा थांब आता
अशी पावसाची अनोखीच गाथा

माझा खो सईचैताली, अनुराधा आणि शब्दसखा यांना.


तुषार जोशी, नागपूर

मंगळवार, १७ ऑगस्ट, २०१०

मनाची कविता

.

मी हरलो म्हणू नकोस
यावेळी हरलोय म्हण
पुन्हा जग जिंकण्यासाठी
येतील कितीतरी क्षण

एकटा उरलो म्हणू नकोस
सध्या एकटा आहे म्हण
आयुष्य संपले नाही अजून
भेटतील किती तरी जण

मी थकलो म्हणू नकोस
जरा दम घेतोय म्हण
पुन्हा झेप घेण्यासाठी
पेटून उठेल एकेक कण

तुषार जोशी, नागपूर
१७ आगस्ट २०१०, ०९:००

.

मंगळवार, १३ एप्रिल, २०१०

बायको म्हणजे

.


बायको म्हणजे
एक सावली
उन्हाला शांत करणारी
बायको असते
पावलोपावली
घराला घरपण देणारी

बायको म्हणजे
निश्चिंतता
घर सुरळीत चालेल याची
बायको म्हणजे
नेमकी जाणीव
गृहस्थाला कर्तव्याची

बायको म्हणजे
ओले केस
न्हाल्यानंतर भुलवणारे
बायको म्हणजे
सुगंधाचेच
कारण जीवनात दरवळणारे

बायको म्हणजे
गोड कारण
घरी लवकर जाण्यासाठी
बायको म्हणजे
प्रेमळ घास
हसत हसत खाण्यासाठी

बायको म्हणजे
प्रेमळ काळजी
हवीहवीशी वाटणारी
बायको म्हणजे
अधिर ओढ
अस्तित्वाला व्यापणारी

बायको म्हणजे
सावध विवेक
सगळीकडे जाणवणारा
बायको म्हणजे
नेमका आवेग
सुरळीत गाडा चालवणारा

बायको म्हणजे
संपूर्णता
गृहस्थाच्या जगण्याची
बायको म्हणजे
समर्थता
माणसाला यश पचवण्याची

तुषार जोशी, नागपूर
१३ एप्रिल २०१० 
 
.

रविवार, १४ मार्च, २०१०

माकड

.

माझे मन म्हणजे,
मुळात एक माकड आहे
याला ताळ्यावर ठेवणे
फार फार अवघड आहे

शहाणपणाचा सुबक
सोनेरी मुकुट घालतं ते
शिस्तीची काठी घेउन
ऐटीमध्ये चालतं ते

लोकांनी हसू नये
म्हणून सगळे नियम पाळतं
गळ्याभोवती प्रगल्भतेचा
पांढरा स्कार्फ घालतं

अनुभवाचा पिवळा झगा
घालून फिरतं सदैव
याला नेहमीच माकडपण
याचं लपवायला हवं

पण हे सगळ बाहेर
आतून उड्या मारतं
मलाच ठाऊक मला काय
सहन करावं लागतं

बायकोबरोबर शॉपिंग
साळसूद नवरा मी
हे म्हणतं वा काय सेल्सगर्ल
हाय झालो जखमी

बॉस कडे देतो मी
लक्ष मिटींग मधे
हे विचारतं ओरडू का
याहूयाहू मधे मधे

रस्त्यावरचा तमाशा
मी म्हणतो वगळून जाऊ
हे नाचतं पुढे मागे
म्हणतं फक्त एकदाच पाहू

मी याचे ऐकत नाही
घरा बाहेर असता कधी
आरश्यासमोर येताच मिळते
याला समोर यायची संधी

मुकुट, छडी, स्कार्फ
आणि त्याचा पिवळा झगा
काढून ठेवतं आरश्या समोर
मग गोलगोल घालतं पिंगा

मन भर माकड चेष्टा
थयथय उड्या बेभान मारतं
निमूटपणे नंतर येऊन
मुकुट छडी झगा मागतं

तुषार जोशी, नागपूर
३० जानेवारी २०१०

.

गुरुवार, ७ जानेवारी, २०१०

या बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही

.

बाहेर जाताना विचारते कोणती साडी घालू
उत्तर देताच म्हणते घालू का हिरवाच शालू
आधीच ठरले होते तर विचारायचे कशाला?
कोणतीही घाल म्हणायची सोय नाही बिचाऱ्याला
तसे म्हटले तर नको तेव्हा रूसून बसणार बाई
या बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही

ही गाडी चालवणार तेव्हा मी डोळे मिटतो
हिला इतर गाड्यांचा अफाट अंदाज असतो
कुठेही ब्रेक लावते कुठेही शहनाई हार्नची
डेंटींग पेन्टींगनेच होते सांगता महिन्याची
हवे तसे वळणावर कधीच वळत नाही
या बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही

आउच्या काऊचे काहीतरी उगाच सांगत बसते
टिव्ही सिरियलच्या प्रसंगांवर हसते रडते
या कानातून त्या कानात केले तर येतो राग
ऐकण्याचे नाटक केले तर तेही पडते महाग
यांना दया म्हणूनही जरा शांत राहता येत नाही
या बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही

तुषार जोशी, नागपूर