रविवार, ८ मार्च, २००९

तू इथेच आहेस

.
.
तू इथेच आहेस
मी पोपटी शर्ट घेऊन
आरशासमोर आलो
की आरशात दिसतेस
नाक मुरडत चेहरा हलवतेस
मग मी निमुट पणे
तुझा आवडता
पांढरा शर्ट घेऊन येतो
आरशात आता
कौतुकाने भरलेला
तुझा हसरा चेहरा पाहतो
.
तू इथेच आहेस
जेवणाचा कंटाळा केला
की डोक्यावर टपली देतेस
तू माझा ना
मग असं नाही करायच
हळुच कानात पुटपुटतेस
मी निमुटपणे
स्वयंपाक करतो आणि
हसत हसत खातो
.
तू इथेच आहेस
झोपताना तुझ्या
असण्याचा सुगंध
मंद पणे दरवळतो
सतत जाणवतो तुझा हात
केसांवरून
गुपचुप तुझी
एक ओढणी आणली आहे
मी बॅगेत भरून
.
.
तुषार जोशी, नागपूर
(०७ मार्च २००९ / टेरीटाऊन)

शनिवार, ७ मार्च, २००९

तू बोलतेस ना

.
.
तू बोलतेस ना
तेव्हा मन बोलतेस
गोड गोड उत्कटतेचे
क्षण बोलतेस
.
मी ऐकतो
मोहरतो
भान विसरतो
तुला ऐकणे माझ्यासाठी
सोहळा ठरतो
.
तू बोलतेस ना
तेव्हा तेव्हा वेळ थांबते
सगळे आयुष्य काही वेळ
विसरायला होते
.
मी ऐकतो
बहरतो
नवा होतो
त्या क्षणांचे
आनंदकण
वेचून घेतो
.
तू बोलतेस ना
पोचतेस तेव्हा शब्दाशब्दातून
आर्त संगीत ऐकू येते
खोल हृदयातून
.
मी ऐकतो
मी जपतो
जतन करतो
तुला ऐकणे माझ्यासाठी
सोहळा ठरतो
.
.
तुषार जोशी, नागपूर
(०७ मार्च २००९/टेरीटाऊन)
.

गुरुवार, ५ मार्च, २००९

साक्षात्कार

.
.
गुदमरून जाईन
इतकी घट्ट मिठी
मला हवी
खूप दिवस पुरेल
अशी तुझी दिठी
मला हवी
.
आवेगात लिहिलेली
भावनांची वही
मला हवी
माझ्या तळहातावर
तुझी एक सही
मला हवी
.
ए नको ना रे
लटका नकार
मला हवा
ओठांवर ओठांचा
गोड साक्षात्कार
मला हवा
.
.
तुषार जोशी, नागपूर