गुरुवार, २७ जून, २०१३

राधा-कान्हा

सुरातून बासरीच्या, जणू बासरी म्हणते, हवी राधा राधा राधा
अशी बासरी भिनली, अणू रेणू तिचा गाई एक, कान्हा कान्हा कान्हा

पहाटले जग सारे, बघे यमुनेचा काठ
कान्हा होई उतावीळ, पाहे राधेचीच वाट
अडवीन येता राधा,  मनी आनंद दाटतो, रोज बेत रचताना
अशी बासरी भिनली, अणू रेणू तिचा गाई एक, कान्हा कान्हा कान्हा

बासरीने मुग्ध होते, राधा हरखून जाई
कान्हा रोज ठरवून, बासरीची धून गाई
रागावेल गोड राधा, अडवतो रे कशाला, रोज पाणी भरताना
अशी बासरी भिनली, अणू रेणू तिचा गाई एक, कान्हा कान्हा कान्हा

रागावते तरी पुन्हा, कान्हा शोधते चोरून
नाही दिसला तं घोर, हळहळे तिचे मन
त्याची खट्याळ लबाडी, हवीहवीशी वाटते, बासरीत रंगताना
अशी बासरी भिनली, अणू रेणू तिचा गाई एक, कान्हा कान्हा कान्हा

~ तुष्की
नागपूर, २७ जून २०१३, ०७:४५

बुधवार, २६ जून, २०१३

आनंद

दिसतेस दोन क्षण
मग तुझी आठवण
जात नाही मनातून

खळी खेळे गालावर
रूप सावळा बहर
शहारणे अंगभर

विसराया होते जग
तुझा भास जागोजाग
असा उत्कट आवेग

तुझा आठव सुंगंध
क्षण क्षण मुग्ध धुंद
माझे जगणे आनंद

~ तुष्की
नागपूर, २६ जून २०१३, ०९:००

शुक्रवार, २१ जून, २०१३

सावली

कधी सांजवेळी मनाच्या तळाशी
निनावी क्षणांचे धुके दाटते
तुझ्या आठवांच्या मीठीतून घ्यावी
पुन्हा ऊब थोडी असे वाटते

लपेटून घेता तुझ्या आठवांना
उमेदून येते पुन्हा पालवी
उफाळून येते मनातून प्रीती
उरी जागवे नित्य आशा नवी

कधी खिन्न होतो जगाच्या उन्हाने
तुझे भास आयुष्य देती मला
तुझे शब्द येती क्षणांच्या रूपाने
जगावे कसे हेच सांगायला

तुझ्या सावलीचे कवच दाट आहे
जगाची उन्हे बाधती ना मला
तुला आठवोनी पुन्हा सिद्ध होतो
अनेकांप्रती सावली व्हायला

~ तुष्की
नागपूर, २२ जून २०१३, ११:००

शुक्रवार, १४ जून, २०१३

पण

निशा किती झकास पण
कशास मी उदास पण

गुलाब घोर लावतो
सतावतो सुवास पण

असायला असे सुरी
तरी किती मिठास पण

असेल ध्येय भव्य ते
सुखी करे प्रवास पण

कठोर 'तुष्कि' बोल तू
बरी नव्हे मिजास पण

~ तुष्की
नागपूर, १४ जून २०१३, ०९:३०