बुधवार, १९ डिसेंबर, २०१२

दुःखाची योजना

खरे लोकं हरत नसतात
मग मी का हरले? असे वाटते का?
बाप्पा सगळे वरून बघतात
मी का फसले? मनास जाचते का?

आपल्या आयुष्यात दुःख असतात
विश्वासघात असतात काही
ते सगळे आपल्यापर्यंत पाठवायला
बाप्पाला लागतात भारवाही
मग आपल्याच आसपासची माणसे
त्याचे माध्यम बनतात
ते वाईट नसतात दुष्ट नसतात
ते तर माध्यम असतात
तावून सुलाखून प्रगल्भ कणखर
त्या वेदना करतात कळले का?

आपण बघतो फक्त वेदना आणि
म्हणतो मलाच त्या कशाला
आपलं नशीबच वाईट समजतो
आणि जाळत बसतो स्वतःला
स्वतःला समजावले पाहिजे
आयुष्य अजून संपलेले नाही
बाप्पाने याहूनही उदात्त असे
आपल्यासाठी ठेवलेय काही
सुख समजण्यासाठी कदाचित
दुःखाची योजना असते का?

आपण रूसून बसू नये मुळी
आपण मनापासूनच जगावं
येणाऱ्या आपल्या सुखासाठी मनाला
निराशेपासून अगदी दूर ठेवावं
बाप्पावरचा विश्वास मावळू नये
याची नेहमी काळजी घ्यावी
त्याच्यावरचा विश्वास त्याला सांगायला
मधे मधे त्याला भेट द्यावी
त्यानेच आयुष्य दिलेल तेव्हा तोच
सर्व काही देईल पटते का?

~ तुष्की
नागपूर, १९ डिसेंबर २०१२, ०९:३०

रविवार, १६ डिसेंबर, २०१२

याच दिवशी

याच दिवशी तुझ्या हातात हात दिला
एक कायमची जागा दिली हृदयात
याच दिवशी सुख दुःख एक झाले
आयुष्याची झाली एक नवी सुरवात

याच दिवशी आयुष्याचा सजला निर्णय
हाच दिवस विश्वासाचा सण ठरला
रुसवे फुगवे आले आणिक निघून गेले
तुझ्या माझ्या सोबतीचा दरवळ उरला

आज चंद्र तुझ्या माझ्या साठी उगवेल
आज वारा गात सुटेल आपलीच गाणी
आज आठवू आपण दिले घेतलेले सारे
डोळ्यांमध्ये असेल आनंदाचे पाणी

~ तुष्की
नागपूर, १५ डिसेंबर २०१२, १२:११

मंगळवार, ११ डिसेंबर, २०१२

इतकच

ममता ताईंनी एक ओळ म्हटली, 'काही नाही.. आठवण आली इतकंच.!..'  मग काही राहवलंच नाही इतकंच.!..

काही नाही.. आठवण आली इतकंच.!..
काळजातली शिवण निघाली इतकंच.!..

डोळ्यांमध्ये कचरा गेला सांगितले ना
तिच्या सहीची वही मिळाली इतकंच.!..

तुझ्या विना हे जगणे आता शक्यच नाही
जातांना ती मला म्हणाली इतकंच.!..

आठवणींना माझी कधीच हरकत नव्हती
गालावरती येते लाली इतकंच.!..

वाट पाहणे जीव जाळणे संपत नाही
पाहता पाहता वर्षे गेली इतकंच.!..

~ तुष्की
नागपूर, ११ डिसेंबर २०१२, ०१:१५