गुरुवार, ३१ मे, २०१२

कुणी अर्थ देता का अर्थ

कुणी अर्थ देता का अर्थ

मित्रांनो..
आता कविता अडखळली आहे
रदिफ अलामत काफियांच्या गराड्यात
अडकून कोरडी पडली आहे
तांत्रिक दृष्ट्या तरबेज असूनही
वजनामधे ढळली आहे

कोणी अर्थ देता का अर्थ..

कवितेला हवाय
आता गंध
आतून येणाऱ्या संवेदनेचा
आणि एक ओलावा हवाय
भावनांच्या शिडकाव्याचा
याला त्याला उत्तरे देण्यात
माझी कविता गुंतली आहे
बोनसाय होऊन, आपलाच तोरा
मिरवताना खुंटली आहे

कोणी अर्थ देता का अर्थ…

वाचल्यावर काटा येईल
असा एक विषय हवाय
पाणी डोळा काठी येईल
असा उदात्त आशय हवाय
तिला वाचताच
हृदयाच्या आतून दाद द्यावी लागेल
असा प्रभाव ज्याचा परिणाम
हृदयाचा ठोका मागेल

मित्रांनो
त्याच त्याच साच्यात फिरून
कविता थकली आहे
काहीच कळेनासे होऊन
मटकन खाली बसली आहे..

कुणी अर्थ देता का अर्थ…

तुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)
३१ मे २०१२, ००:३०

बुधवार, ३० मे, २०१२

संपली परीक्षा

संपली परीक्षा निकालास
आहे अवकाश अजून
मुक्त श्वास घेण्याची आली
वेळ सावकाश सजून

कितीतरी छंद मनाचे
पुरते होतील आता
राहून गेलेल्या स्वप्नांच्या
येईल मागे आता जाता
साखर झोप पहाटे अलगद
दुलई डोक्यावर ओढून

संपली परीक्षा निकालास
आहे अवकाश अजून
मुक्त श्वास घेण्याची आली
वेळ सावकाश सजून

फुटाळ्याच्या** काठावर
मिळतील काही तास अधिक
रोज सण स्वातंत्र्याचे
घडतील आपसूक
पुस्तकांना सिनेमांना
भेटी मित्रांना घेऊन

संपली परीक्षा निकालास
आहे अवकाश अजून
मुक्त श्वास घेण्याची आली
वेळ सावकाश सजून

(फुटाळा** - हे नागपुरचे नरिमन पॉईंट आहे)

तुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)
३० मे २०१२, ०९:००

मंगळवार, २९ मे, २०१२

ओढ मनाची

केव्हाच तिला मी
ही ओढ मनाची माझ्या
ही प्रीत अनावर
सांगत नाही

पण डोळ्यांना डोळे भिडले की गरज कशाची
राहत नाही

साठवतो मी
ते रूप तिचे हृदयात
आठवतो मी
ते कितेकदा दिवसात
मी हसतो फुलतो झुलतो घेऊन तिच्या गंधाचा श्वासात छंद
मी रूसतो जळतो झुरतो साहून तिच्या नसण्याची वेदना मंद
समोर आल्यावर ती
पाहण्यात जातो वेळ
कोणतेच शल्य
उरत नाही

केव्हाच तिला मी
ही ओढ मनाची माझ्या
ही प्रीत अनावर
सांगत नाही

पण डोळ्यांना डोळे भिडले की गरज कशाची
राहत नाही

ती आहे इतकेच
पुरते मला जगण्याला
तिचे हसणे बस
पुरते मला फुलण्याला
मी रमतो सुचतो रचतो शब्दात तिच्या असण्याचे भावूक गाणे
मी भिजतो रुजतो अंकुरतो घेऊन तिच्या भासांचे धुंद तराणे
ती आल्यावर पण
क्षण क्षण जपता जपता
निसटून जातो
पुरत नाही

केव्हाच तिला मी
ही ओढ मनाची माझ्या
ही प्रीत अनावर
सांगत नाही

पण डोळ्यांना डोळे भिडले की गरज कशाची
राहत नाही

तुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)
२९ मे २०१२, ०९:००

रविवार, २७ मे, २०१२

खुळा झालो गं

वेड लागलेय मला खुळा झालो गं
खुळा झालो सावळ्या रंगावर
तू येशील भेटायला म्हणालीस
मी खूश आता माझ्याच भाग्यावर

पाहिले मी तुला लोकलमधे
मोकळे सोडून केस कुरळे
वाटले तिथेच मिळाली दुनिया
संपले क्षणात शोध सगळे
योगायोग म्हणू कसा गं सांग ना
मी बनलोय तुझ्याच साठी खरं
.
वेड लागलेय मला खुळा झालो गं
खुळा झालो सावळ्या रंगावर
तू येशील भेटायला म्हणालीस
मी खूश आता माझ्याच भाग्यावर

नाव तुझं मनात घिरट्या घालतं
लिहावं किती बघत रहावं किती
चित्त तुझ्या विचारांमागे धावतं
तुला क्षणोक्षणी स्मरावं किती
तू येशील म्हणून जपून ठेवलं
गुलाबाचं बघ फूल हसरं गोजिरं
.
वेड लागलेय मला खुळा झालो गं
खुळा झालो सावळ्या रंगावर
तू येशील भेटायला म्हणालीस
मी खूश आता माझ्याच भाग्यावर

~तुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)
२७ मे २०१२,१९:३०

रविवार, १३ मे, २०१२

पिल्लू

भेटीस माऊलीच्या
आसावले कधीचे
पिल्लू कुण्या अभाग्या
घायाळ पक्षिणीचे
.
डोळ्यात रोज पाणी
आणूनिया पहाते
जेव्हा कुणाचि आई
पिल्लू कुशीत घेते
.
असल्या किती पिलांना
आईचि भेट नाही
म्हटली कधीच नाही
साधी कुणी अंगाई
.
होतो जराशि आई
डोळे करूण स्मरतो
भेटीस त्या पिलांच्या
मी आश्रमात जातो
.
.
तुषार जोशी, नागपूर
(१५ मार्च २००९, टेरीटाऊन)

माझी आई

मायेची गोड गोड
हाक माझी आई
छोटेसे गोल गोल
नाक माझी आई
.
गुरगुट्टा मऊ ताक
भात माझी आई
केसातून फिरणारा
हात माझी आई
.
तत्वांचे धारदार
टोक माझी आई
भीती घालवणारा
श्लोक माझी आई
.
.
तुषार जोशी, नागपूर
(१७ मार्च २००९, टेरीटाऊन)

कोण येतं फुंकर मारायला?

जग नेहमी बदलत असतं
बदलत नसतं ते प्रेम असतं
असं प्रेम कोण करतं?
आपल्यासाठी कोण झुरतं?
दुखलं खुपलं औषध लावायला
कोण येतं फुंकर मारायला?
सर्वात पहिले येते आई
विनाशर्त प्रेम करायला

ऱ्हास नसतो आईच्या छायेला
अंत नसतो आईच्या मायेला

आई नेहमी मर्जी राखते
सोन्या रूसला रागवला तरी
नेहमी ईतकीच काळजी करते
घरासाठी दिवसरात्र
आई आपली कामात असते
आईच्या धावपळीमुळेच
घर आरामत असते
सोन्या चुकला की रागवते
पण क्षमा करते प्रत्येक वेळेला

ऱ्हास नसतो आईच्या छायेला
अंत नसतो आईच्या मायेला

आई आणि ममता
हे नातं अतूट असतं
आई आणि ममता
याहून मोठं कुणीच नसतं
मोठ्यात मोठ्या माणसाला
देखील हवी असते आई
विच्च्ारे गरीब गरीब असतात
ज्यांच्याजवळ नसते आई
बाकी सगळे गर्भश्रीमंत
हात आईचा ज्यांच्या पाठीला

ऱ्हास नसतो आईच्या छायेला
अंत नसतो आईच्या मायेला

तुषार जोशी, नागपूर

मंगळवार, १ मे, २०१२

जिद्द

जिंकण्याची जिद्द आहे हारलो आधी जरी,
ध्यास नाही सोडला
मी प्रयत्नांचा सरावाचा सुकाणू घेऊनी
मार्ग माझा शोधला

एकटा झालो तरीही दुःख ना केले कधी
एकट्यांना शोधले
हासण्याचा मंत्र त्यांना देऊनी आलो किती
मित्र सच्चे लाभले

वाटले आकाश, जेथे कोंडलेली पाहिली
कोवळी स्वप्ने किती
ज्या क्षणी झाली तयारी झेप घेण्याची नभी
लाभल्या साऱ्या मिती

जे मिळाले तेच घेवोनी पुढे चालायचे
जाणले मी नेहमी
जे मिळाले ना मला हव्यास त्याचा सोडला
तृप्त 'तुष्की' आज मी

~ तुष्की (+९१ ९८२२२ २०३६५)

नागपूर
०१ मे २०१२, १९:१५