ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ५ जून, २०१२

तिला हसताच येत नाही

तिला हसताच येत नाही,
कारण ती स्वतःवरच रूसलीय.
दार घट्ट बंद करून ..
स्वतःला कोंडून बसलीय.
.
पाऊस म्हणाला ये ना भीज,
थेंब अंगावर घे ना प्लिज.
तेव्हा म्हणाली तू नाहीस माझ्यासाठी,
मला नाही सोसायची तुझी मिठी.
.
आरसा म्हणाला बघ बघ जरा,
किती सुंदर दिसतोय चेहरा.
तेव्हा म्हणाली पुरे कौतुक तुझे,
लोकांनी सांगितलेय मी कशी दिसते ते.
.
लोकांनी केलेल्या वर्णनाइतकेच
स्वतःचे अस्तित्व ठरवून फसलीय.
दार घट्ट बंद करून ...
स्वतःला कोंडून बसलीय
.
.
तुषार जोशी, नागपूर

मंगळवार, २९ मे, २०१२

ओढ मनाची

केव्हाच तिला मी
ही ओढ मनाची माझ्या
ही प्रीत अनावर
सांगत नाही

पण डोळ्यांना डोळे भिडले की गरज कशाची
राहत नाही

साठवतो मी
ते रूप तिचे हृदयात
आठवतो मी
ते कितेकदा दिवसात
मी हसतो फुलतो झुलतो घेऊन तिच्या गंधाचा श्वासात छंद
मी रूसतो जळतो झुरतो साहून तिच्या नसण्याची वेदना मंद
समोर आल्यावर ती
पाहण्यात जातो वेळ
कोणतेच शल्य
उरत नाही

केव्हाच तिला मी
ही ओढ मनाची माझ्या
ही प्रीत अनावर
सांगत नाही

पण डोळ्यांना डोळे भिडले की गरज कशाची
राहत नाही

ती आहे इतकेच
पुरते मला जगण्याला
तिचे हसणे बस
पुरते मला फुलण्याला
मी रमतो सुचतो रचतो शब्दात तिच्या असण्याचे भावूक गाणे
मी भिजतो रुजतो अंकुरतो घेऊन तिच्या भासांचे धुंद तराणे
ती आल्यावर पण
क्षण क्षण जपता जपता
निसटून जातो
पुरत नाही

केव्हाच तिला मी
ही ओढ मनाची माझ्या
ही प्रीत अनावर
सांगत नाही

पण डोळ्यांना डोळे भिडले की गरज कशाची
राहत नाही

तुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)
२९ मे २०१२, ०९:००