मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१२

माझ्या त्या सार्‍या कविता

जग रुसले तेव्हा आल्या माझ्या त्या सार्‍या कविता
दु:खाचे औषध झाल्या माझ्या त्या सार्‍या कविता

मी किती लपविले सांगू संदर्भ तुझ्या प्रीतीचे
बडबडल्या सगळे साल्या माझ्या त्या सार्‍या कविता

कोणाचे कुणीच नसते वाटले मनाला जेव्हा
आम्ही आहोत म्ह्णाल्या माझ्या त्या सार्‍या कविता

आयुष्याच्या रूंदीची  चर्चा चालवली त्यांनी
पाठवल्या मीटरवाल्या माझ्या त्या सार्‍या कविता

जगताना जळलो इतके स्वप्नांचीच झाली राख
त्या राखेतून उडाल्या माझ्या त्या सार्‍या कविता

तुषार जोशी, नागपूर
२१ ऑगस्ट २०१२, १४:००
+९१ ९८२२२ २०३६५

रविवार, ५ ऑगस्ट, २०१२

किती तरी दिवसात

किती तरी दिवसात आपली
भेटच झाली नाही
रात्री अपरात्री घोटून
कॉफीच केली नाही
.
कांदे भजी खाता खाता
गप्पा रचल्या नाही
तुझ्या भावविभोर शब्दात
कविता सजल्या नाही
.
तार स्वरात वा~यावरती
सूर फेकले नाही
काहितरी करायला पाहिजे
असे ऐकले नाही
.
भटाबिटांच्या कवितांची पण
छेड काढली नाही
सगळे मिळून अरे वेड्या
पत्र वाचली नाही
.
किती तरी दिवसात लेका
तुला भेटलो नाही
शहाण्यासारखा वागत गेलो
वेडाच झालो नाही
.
.
तुषार जोशी, नागपूर

तुला पाहता

तुला पाहता जीव वेडावतो गं तुला पाहता
सुखाचा झरा का उरी वाहतो गं तुला पाहता?

तुझे केस सोडून ते मोकळे तू मला भेटता
उन्हाळ्यातही गारवा भासतो गं तुला पाहता

तुझा सावळा रंग आहे तुझा देखणा दागिना
मधाचा मधू गोडवा लाजतो गं तुला पाहता

तुझे हासणे ओतते धूंद तारूण्य चोहीकडे
पहा मंद वारा कसा नाचतो गं तुला पाहता

तुझे ओठ सांगून जाती मुक्याने हवे ते मला
जिवाचा शहारा पुरा पेटतो गं तुला पाहता

तुझे रूप वेधून घेते मनाला खुळ्या सारखे
तुझी साथ लाभो सदा मागतो गं तुला पाहता

तुषार जोशी, नागपूर
११ मार्च २०११, २२:५०