रविवार, २९ डिसेंबर, २०१३

रसिक

मी माझ्या निवांत समयी
टिव्ही रेडियोच्या
गोंगाटापासून दूर
नेहमीच्या अभ्यासिकेत
हळव्या मनाने काढून
वाचतोय ही
जिप्सी मधली पाडगावकरांची कविता
कितव्यांदा ..
ते आठवत नाही..
... तरीही ती नवीनच वाटते
आनंद होऊन पुन्हा मनात दाटते

तश्याच कविता
लिहून जाव्यात वाटते मला
ज्या कविसंम्मेलने
किंवा गीतांमधे गाजणार नाहीत
कदाचित...
पण माझ्यासारखाच कोणी
एक रसिक
घेऊन बसेल उद्या
त्याच्या खास जागेत
सर्व गोंगाटांपासून दूर
.. पुन्हा एकदा वाचण्यासाठी
अगणीत वेळा वाचून झाली असेल
तरीही...
पुन्हा मनापासून..

~ तुष्की, नागपूर
२९ डिसेंबर २०१३, १९:३०

रविवार, २२ डिसेंबर, २०१३

पाऊस

व्याकुळल्या बीजासाठी
तू चैतन्याचा हात
रूजण्याच्या महोत्सवाची
तू गंधमयी सुरवात

तू त्याच्या स्नेहसुधेच्या
अभिषेकाचे आवर्तन
बुजणाऱ्या तृणपात्याला
तू जगण्याचे आमंत्रण

तू आठवणींचा साठा
हळवी भासांची भुरभुर
तू ओढ सागर गहिरी
भेटाया उत्कट आतुर

~ तुष्की
नागपूर, २२ डिसेंबर २०१३, १७:५०

गुरुवार, १९ डिसेंबर, २०१३

चेहऱ्याचा चंद्र

(साचा: विल'नॅल)

तुझे मोकळे मोकळे केस ओले
पहाटेस आली रया उत्सवाची
तुला पाहताना मन चिंब झाले

जपण्यास क्षण केवढे मिळाले
अरे दृष्ट काढा अश्या वैभवाची
तुझे मोकळे मोकळे केस ओले

एका क्षणी भान हरपून गेले
सर कोसळावी जशी पावसाची
तुला पाहताना मन चिंब झाले

इंद्रधनू थेंब थेंब सजलेले
काय ऐट केसांमधल्या थेंबाची
तुझे मोकळे मोकळे केस ओले

उर पोखरती मदनाचे भाले
गोरीमोरी झाली दशा माणसाची
तुला पाहताना मन चिंब झाले

चेहऱ्याचा चंद्र केस ढग झाले
धुंद चांदण्यात मजा जगण्याची
तुझे मोकळे मोकळे केस ओले
तुला पाहताना मन चिंब झाले

~ तुष्की
नागपूर, १९ डिसेंबर २०१३, २१:४०

रविवार, ८ डिसेंबर, २०१३

अज्ञात कवी

मी लिहेन केव्हातरी
एक कविता
जी लोकांच्या मनाचा
वेगळाच ठाव घेईल

चिरून काढेल जी
वाचकाचे अंतरंग
आणि ती कविताच
माझी ओळख होऊन जाईल

ही कविता मला घेऊन जाईल
वाचकप्रसिद्धीच्या ढगात
माझ्या लिखाणाचा ठरेल ती
वळण बिंदू!!

हिच्या प्रभावामुळेच
मग लोक माझ्या
जुन्या कवितांनाही वाचू लागतील
समजून घेऊ लागतील, दादही देतील

ती कविता माझ्याने
लिहून होई पर्यंत
कदाचित मी एका मोठ्या जगासाठी
अज्ञातच राहीन.

अश्याच अनेक अज्ञात कवींप्रमाणे
ओळख नसलेला कवी.

[कणा कवितेने मला कुसुमाग्रजांचे वेड लावले, प्रेम म्हणजे सेम असतं या कवितेने पाडगावकरांचे वेड लावले, बघ माझी आठवण येते का आणि गारवा ने सौमित्र चे वेड लावले, पुसणारं कोणी असेल तर या ओळींनी चंद्रशेखर गोखलेंच्या प्रेमात पाडले, इतकेच मला सरणावर जाताना कळले होते या ओळींनी मी सुरेश भटांवर फिदा झालो, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता या ओळीने ग्रेस च्या प्रेमात पडलो, श्रावणमासी ने बालकवी, चाफा बोलेना ने भारातांबे, अरे संसार संसार ने बहिणाबाईंना ओळखायला लागलो, अशी किती उदाहरणे देऊ जिथे काही ओळींनी कवीच्या प्रेमात पडायला झाले आणि मग त्या कवीच्या सगळ्या कविता शोधून वाचायचे वेड लागले]

~ तुष्की
नागपूर
८ डिसेंबर २०१३, २३:००