गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१३

कविता

एक कविता आहे
मनात दडून बसलेली

तिची वाट पाहत
मी कल्पनेचे दार उघडेच ठेवतो
भावनांना डचमळू देतो
आणि शब्दांचे झरे वाहत राहू देतो

जे जे सुचेल ते
लिहीत जातो कागदावर
मग वाचतो ती कविता
छान असते ती
पण जिची वाट पाहतोय
ती अजून आलेली नसते

पण मला माहिताय
कोणत्यातरी कल्पनेचे बोट धरून
भावनेच्या कोणत्यातरी पदरात दडून
शब्दांच्या कोणत्यातरी ओघात
ती नक्की येईल
मला भेटायला

मला लिहित राहायला हवे
तिच्यासाठी तरी
मला लिहित राहायलाच हवे.

~ तुष्की
नागपूर
२८ नोव्हेंबर २०१३, २१:२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: