शनिवार, १३ जून, २००९

एकच डेयरी मिल्क

.
.
बस स्टाप वर भेटीन
बघ वेळेवरती येशील
ती मोरपंखी रंगाची
सुंदर साडी नेसशील
.
मग नेहमीसारखे
शेवटचा स्टॉप घेऊ
बसमध्ये मनसोक्त
सगळं बोलून पाहू
.
एकच डेयरी मिल्क
दोघ दोघं खाऊ
हृदयाच्या ठोका चुकवू
हातात हात घेऊ
.
परतताना हळूच पत्र
हातामध्ये ठेव
पुन्हा डोळेभरून बघ
डोळ्यात आणून जीव
.
सोवानिवृत्ती साठीचे वय
आज बाजूला ठेऊ
आपण नवरा बायको
हेपण विसरून जाऊ
.
तुषार जोशी, नागपूर
.
.

शुक्रवार, १२ जून, २००९

दारे झाली किती बंद

.

.
दारे झाली किती बंद
नाही मानली मी हार
आयुष्यात घेणे नाही
कधी माघार माघार
.
माझ्या वर चालू आले
रूढी कांडांचे वादळ
माझ्या नावेच्या पाठीशी
माझ्या तत्वांचेच बळ
माझ्या हुकुमात माझे
सारे विकार विकार
.
केला सातत्याचा बाण
घेत यशाचाच नेम
एकवटून डोळ्यात
आले माझे रोम रोम
यश चळ चळ कापे
असा प्रहार प्रहार
.
मिळाल्याचा ना हिशोब
हिशोब ना दिल्याचाही
जे मिळाले घेत गेलो
देत गेलो सर्व काही
मला आवडते मन
माझे उदार उदार
.
होवो सतत प्रवास
नित्य नवी लागो गावे
माझ्या उत्कट मनाला
मिळो कवितांचे थवे
माझ्यामुळे आनंदाचा
होवो प्रचार प्रचार
.
.
तुषार जोशी, नागपूर

.

बुधवार, १० जून, २००९

चितचोर

अाले वयात वयात
झाली सुगंधी चाहूल
प्रीती कथा कवितांची
पडे काळजाला भूल - १
-
नवे कॉलेज कॉलेज
नव्या मैत्रिची पालवी
मन म्हणे बागडावे
लाज नेमके अडवी - २
-
कसा लबाड अारसा
रूप सुंदर दाखवी
वाटे स्वतःचीच छबी
पुन्हा पुन्हा निरखावी - ३
-
अाला हसत हसत
राजबिंडा चितचोर
वर्गामध्ये नेमका तो
बसे माझ्याच समोर - ४
-
त्याचे दिसणे सोज्वळ
हसताना खळी गाली
नकळत बोलताना
माझ्या गाली येते लाली - ५
-
मन म्हणते ग वेडे
अशी गुंतू नको बाई
अाजकाल नाही कुठे
भरवसा कुणाचाही - ६
-
होता नजरा नजर
धडधड ह्रदयात
डोळ्यातून निसटते
अाणले ना जे शब्दात - ७
-
घरी जाताना एकदा
म्हणाला तो अडवून
मन कशात लागेना
अावडते तू म्हणून - ८
-
झाले लाजून मी चूर
काय करू कुठे जाऊ
गगनातही मावेना
अानंदाला कुठे ठेऊ - ९
-
छोटी ला मीठी घालून
गरा गरा फिरवले
झोपी जाताना उशीच्या
घट्ट कुशीत शिरले - १०
-
झोप लागेना उडाली
छोटी ला काही कळेना
ताई कशी करते ग?
विचारते पुन्हा पुन्हा - ११
-
कॉलेजातले सोनेरी
दिस सरले पाहता
एक त्याचे माझे विश्व
वेगळाले न राहता - १२
-
बोलावले खास जेव्हा
बागेमद्ध्ये अाज त्याने
विनाकारण अडला
श्वास उगाच शंकेने - १३
-
अाई बाबांचा नकार
तेव्हा त्याने सांगितला
फूल तोडताना काटा
खोलवर गं रूतला - १४
-
किती रडले रडले
काही उपाय सुचेना
वडिलांच्या इच्छेविण
पाऊलही टाकवेना - १५
-
घरी पोचले हरून
निराश मी उदास मी
तुझे लग्न ठरवले
दिली छोटी ने बातमी - १६
-
माझ्या ह्रदयाचा कोणी
इथे विचार करेना
नको नको ते मिळते
हवे हवे ते मिळेना - १७
-
म्हणे घातली मागणी
लग्न पण ठरवले
अाई बाबा तुम्ही सुद्धा
मला नाही विचारले - १८
-
फोटो बघून मुलाचा
पण अाले भानावर
अग बाई हातं माझा
राजबिंडा चितचोर - १९
-
किती दुष्ट अाहे मेला
किती छळले ना त्याने
एका मागणीत केले
पण अायुष्याचे सोने - २०
-
तुषार जोशी, नागपूर
(०९ जून २००९)

शनिवार, ६ जून, २००९

हवी तुझी साथ मला

.
.
मी जिद्दीने प्रयत्न करतोच 
अगदी झोकून देतो स्वतःला 
पण अनेक प्रयत्न करूनही 
जेव्हा सगळं चुकत जातं 
अाणि पळून जावंस वाटतं 
तेव्हा़़़ 
हवी तुझी साथ मला 
डोळ्यांनी धीर देणारी 
"टिकून रहा लढ लढ" 
असं सांगणारी ़
.
यशाचीही नशा चढते 
सर्व सुखे येतात दिमतीला 
अाणि सुख दुखावं तसं 
मन कधी कधी भरकटतं 
अती करायाला बघतं 
तेव्हा़़़ 
हवी तुझी साथ मला 
डोळ्यांनी दटावणारी 
"कर्तव्य विसरू नकोस" 
असं सांगणारी ़
.
.
तुषार जोशी, नागपूर 
(०६ जून २००९)

.
.