बुधवार, २२ जानेवारी, २०१४

आलं पाहिजे

डोंगर होता आलं पाहिजे
पाय जमिनित घट्ट रोवून
येणाऱ्या प्रत्येक वादळाला
आव्हान देता आलं पाहिजे
डोंगर होता आलं पाहिजे

डोंगर होता आलं पाहिजे
जमिनिवर राहून देखिल
महत्वाकांक्षेचं बोट
ढगात नेता आलं पाहिजे
डोंगर होता आलं पाहिजे

डोंगर होता आलं पाहिजे
थकल्या भागल्या जीवाला
आश्वासक उब देत
कुशीत घेता आलं पाहिजे
डोंगर होता आलं पाहिजे

डोंगर होता आलं पाहिजे
पावसाला अंगाखांद्यावर
खेळवून सागराकडे
सोडून येता आलं पाहिजे
डोंगर होता आलं पाहिजे

~ तुष्की
नागपूर, २२ जानेवारी २०१४, ००:३०