मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१२

चिखल

राजकारणाचा
चिखल हा झाला
भ्रष्टाचार सारा
अन्याय माजला

जपावे कसे हो
मनाचे कमळ
टिकावे कसे हो
विचार निर्मळ

संताप संताप
जिवाचा वाढतो
उपाय सुचेना
वैताग जाळतो

राज्य कारभार
प्रणाली नासली
जनमानसात
लाचारी साचली

त्रासुन तरूण
विदेशी पळती
थांबवावी कशी
ज्ञानाची गळती

समाजाने आता
पेटून उठावे
अंधकारमय
ग्रहण फिटावे

विचार क्रांतीचा
पाऊस पडावा
चिखल सगळा
धुवून निघावा

~ तुष्की
नागपूर
१६ आक्टिबर २०१२, १२:४०

सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१२

पुन्हा

पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंसं वाटतं
तुझ्या सुखाचं कारण ठरावंसं वाटतं

मुलींच्या शाळा अभ्यास
यात मन लावून राबतेस
अजून पुढे शीकण्यासाठी
अभ्यास करत  रात्री जागतेस
तेव्हा तुझं कौतुक वाटून
मनभरून बघावंसं वाटतं
पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंसं वाटतं

मिळेल तेवढाच माझा वेळ
समाधानाने समजून घेतेस
जगणे सफल होण्यासाठी
सोबतीचे बळ देतेस
कितीही केलं तरी तुझ्यासाठी
अजून काही करावसं वाटतं
पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंसं वाटतं

~ तुष्की
०८ आक्टोबर २०१२, १०:००
वर्नान हिल्स, शिकागो

गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१२

अमूल्य ठेव

विका मंगळसूत्राला
छापा पुस्तक तुमचे
समजावले मी त्यांना
धागे तोडा संकोचाचे

मंगळसूत्राच्या विना
फिरले मी दिस काही
कविता संग्रहा साठी
कशाचीच चिंता नाही

गाजे कविता संग्रह
राज्य पुरस्कार त्याला
स्वप्न पूर्ण होता त्यांचे
जन्म माझा आनंदला

पुरस्काराच्या पैशाने
मंगळसूत्र नि कुडी
आणली त्यांनी, मला ही
ठेव अमूल्य केवढी

तुषार जोशी, नागपूर
०४ आक्टोबर २०१२, १९:३०
वरनॉन हिल्स, शिकागो