बुधवार, ९ एप्रिल, २०१४

सागर

जेव्हा आपले श्वास
परस्पर गुंतले होते
आणि ओठ बुडाले होते
अनामिक सोहळ्यात
जेव्हा वेळ थांबून गेली होती
भान हरवलेले होते
बोटे अडकली होती
घनदाट केसांच्या जाळीत
मला सांग
तेव्हाचे माझे तुझे अस्तित्व
वेगळे काढता येईल का?
ते तर अद्वैत होते
माझ्याही पलिकडले
तुझ्याही पलिकडले
ते एक वेगळेच
अस्तित्व होते
आवेग ओसरल्यावर
ती पावसाची सर होती असे वाटतेय
आपण एकमेकांकडे चिंब भिजल्या नजरेने
बघतोय..
आणि पुन्हा
ते स्वतंत्र अस्तित्व सहन न होऊन
पुन्हा आवेग होतोय
एकमेकात मिसळून जाण्यासाठी
कायमचे...
नदी सागरासारखे
तुला एक सांगू
सागराला आपण कधी एकटे पाहिलेलेच नाही
हे जे दिसते ते तर
नदीशी एक झाल्यावर जन्मलेले
त्याचे नवे अस्तित्व आहे बघ!

~ तुष्की, नागपूर
०९ एप्रिल २०१४, ०७:४५
वर्नान हिल्स

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: