मंगळवार, २२ सप्टेंबर, २०१५

क्रेडिट

अमुक दोष टाळावा म्हणुनी
खड्यास आपण स्वीकारावे
कुणीतरी सांगितले म्हणजे
उगाच डोके शिणून जावे
.
यश आले की म्हणतिल सगळे
खड्यांमुळे हे तुम्हा मिळाले.
अपयश येता म्हणतिल ते की
गंडांतर ते लहान झाले.
.
अपुल्या सुखदु:खाला आपण
अभिमानाने स्वीकारावे.
त्याचेही क्रेडिट एखाद्या
खड्यालाच का घेऊ द्यावे?
.
इतरांनी त्यांच्या श्रद्धेने
कितिही बोटे भरून घ्यावी
मजला वाटे सुखदु:खाची
निर्मळ सरिता मला मिळावी
.
बोट मोकळे मीहि मोकळा
अपयश वा यश येवो भेटी
मिळायचे ते मिळो बापडे
कर्तुत्वाने अपुल्या हाती
.
तुष्की नागपुरी
२२ सप्टेंबर २०१५, ०८:००

(जाती: पादाकुलक - मात्रा १६)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: