रविवार, १ फेब्रुवारी, २०१५

वेडा कवी

.
सुर्व्यांसारखे
कारखान्यात खपलो नाही
त्यांच्यासारखी चळवळ तळमळ
शब्दांना येणार नाही
ईंदिरा, निरजा
यांच्याप्रमाणे स्त्री जन्मात
आलो नाही
तितक्या प्रखर स्त्रीजाणीवा
माझ्या शब्दांना कळणार नाही
ढसाळांसारखा
दलीत मानल्या जाणाऱ्या समाजात
जन्मलो नाही
तेव्हा विद्रोह आणि दलीत वेदना
तेवढ्या उफाळून
माझ्या शब्दात उतरणार नाही
बऱ्यापैकी ठीकठाकच घरात जगलो
म्हणून भीषण दारिद्र्य
स्वानुभवाने मांडू शकणार नाही
शेवाळकर, द.भि सारखे शब्दप्रभूं
कवी म्हणून काही लोकांस अमान्य आहेत
इथे माझ्या कवितांचा वेगळा ठसा
शैलीही नाही
तेव्हा मला कदाचित लोक
कवी सुद्धा मानणार नाहीत
पण..
कधी कधी खूपच हळवं होतं मन
सैरभैर होतं
आणि शब्दांना अनामिक
वळण लागतं लय येते गंध सुटतो
आणि जे काही लिहिल्या जातं
तिला मी कविताच मानतो
ती मला आनंद देते
जग विसरायला लावते
आणि जगण्याची नवी उमेद देते
मी कुणाला कवी वाटलो नाही
तरी मी स्वतःला कवीच म्हणतो त्यावेळी
एक वेडा कवी !
.
तुष्की नागपुरी
नागपूर, ११ जानेवारी २०१५, २०:३०

२ टिप्पण्या:

ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: