बुधवार, १९ डिसेंबर, २०१२

दुःखाची योजना

खरे लोकं हरत नसतात
मग मी का हरले? असे वाटते का?
बाप्पा सगळे वरून बघतात
मी का फसले? मनास जाचते का?

आपल्या आयुष्यात दुःख असतात
विश्वासघात असतात काही
ते सगळे आपल्यापर्यंत पाठवायला
बाप्पाला लागतात भारवाही
मग आपल्याच आसपासची माणसे
त्याचे माध्यम बनतात
ते वाईट नसतात दुष्ट नसतात
ते तर माध्यम असतात
तावून सुलाखून प्रगल्भ कणखर
त्या वेदना करतात कळले का?

आपण बघतो फक्त वेदना आणि
म्हणतो मलाच त्या कशाला
आपलं नशीबच वाईट समजतो
आणि जाळत बसतो स्वतःला
स्वतःला समजावले पाहिजे
आयुष्य अजून संपलेले नाही
बाप्पाने याहूनही उदात्त असे
आपल्यासाठी ठेवलेय काही
सुख समजण्यासाठी कदाचित
दुःखाची योजना असते का?

आपण रूसून बसू नये मुळी
आपण मनापासूनच जगावं
येणाऱ्या आपल्या सुखासाठी मनाला
निराशेपासून अगदी दूर ठेवावं
बाप्पावरचा विश्वास मावळू नये
याची नेहमी काळजी घ्यावी
त्याच्यावरचा विश्वास त्याला सांगायला
मधे मधे त्याला भेट द्यावी
त्यानेच आयुष्य दिलेल तेव्हा तोच
सर्व काही देईल पटते का?

~ तुष्की
नागपूर, १९ डिसेंबर २०१२, ०९:३०

रविवार, १६ डिसेंबर, २०१२

याच दिवशी

याच दिवशी तुझ्या हातात हात दिला
एक कायमची जागा दिली हृदयात
याच दिवशी सुख दुःख एक झाले
आयुष्याची झाली एक नवी सुरवात

याच दिवशी आयुष्याचा सजला निर्णय
हाच दिवस विश्वासाचा सण ठरला
रुसवे फुगवे आले आणिक निघून गेले
तुझ्या माझ्या सोबतीचा दरवळ उरला

आज चंद्र तुझ्या माझ्या साठी उगवेल
आज वारा गात सुटेल आपलीच गाणी
आज आठवू आपण दिले घेतलेले सारे
डोळ्यांमध्ये असेल आनंदाचे पाणी

~ तुष्की
नागपूर, १५ डिसेंबर २०१२, १२:११

मंगळवार, ११ डिसेंबर, २०१२

इतकच

ममता ताईंनी एक ओळ म्हटली, 'काही नाही.. आठवण आली इतकंच.!..'  मग काही राहवलंच नाही इतकंच.!..

काही नाही.. आठवण आली इतकंच.!..
काळजातली शिवण निघाली इतकंच.!..

डोळ्यांमध्ये कचरा गेला सांगितले ना
तिच्या सहीची वही मिळाली इतकंच.!..

तुझ्या विना हे जगणे आता शक्यच नाही
जातांना ती मला म्हणाली इतकंच.!..

आठवणींना माझी कधीच हरकत नव्हती
गालावरती येते लाली इतकंच.!..

वाट पाहणे जीव जाळणे संपत नाही
पाहता पाहता वर्षे गेली इतकंच.!..

~ तुष्की
नागपूर, ११ डिसेंबर २०१२, ०१:१५

मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१२

चिखल

राजकारणाचा
चिखल हा झाला
भ्रष्टाचार सारा
अन्याय माजला

जपावे कसे हो
मनाचे कमळ
टिकावे कसे हो
विचार निर्मळ

संताप संताप
जिवाचा वाढतो
उपाय सुचेना
वैताग जाळतो

राज्य कारभार
प्रणाली नासली
जनमानसात
लाचारी साचली

त्रासुन तरूण
विदेशी पळती
थांबवावी कशी
ज्ञानाची गळती

समाजाने आता
पेटून उठावे
अंधकारमय
ग्रहण फिटावे

विचार क्रांतीचा
पाऊस पडावा
चिखल सगळा
धुवून निघावा

~ तुष्की
नागपूर
१६ आक्टिबर २०१२, १२:४०

सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१२

पुन्हा

पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंसं वाटतं
तुझ्या सुखाचं कारण ठरावंसं वाटतं

मुलींच्या शाळा अभ्यास
यात मन लावून राबतेस
अजून पुढे शीकण्यासाठी
अभ्यास करत  रात्री जागतेस
तेव्हा तुझं कौतुक वाटून
मनभरून बघावंसं वाटतं
पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंसं वाटतं

मिळेल तेवढाच माझा वेळ
समाधानाने समजून घेतेस
जगणे सफल होण्यासाठी
सोबतीचे बळ देतेस
कितीही केलं तरी तुझ्यासाठी
अजून काही करावसं वाटतं
पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंसं वाटतं

~ तुष्की
०८ आक्टोबर २०१२, १०:००
वर्नान हिल्स, शिकागो

गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१२

अमूल्य ठेव

विका मंगळसूत्राला
छापा पुस्तक तुमचे
समजावले मी त्यांना
धागे तोडा संकोचाचे

मंगळसूत्राच्या विना
फिरले मी दिस काही
कविता संग्रहा साठी
कशाचीच चिंता नाही

गाजे कविता संग्रह
राज्य पुरस्कार त्याला
स्वप्न पूर्ण होता त्यांचे
जन्म माझा आनंदला

पुरस्काराच्या पैशाने
मंगळसूत्र नि कुडी
आणली त्यांनी, मला ही
ठेव अमूल्य केवढी

तुषार जोशी, नागपूर
०४ आक्टोबर २०१२, १९:३०
वरनॉन हिल्स, शिकागो

मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१२

माझ्या त्या सार्‍या कविता

जग रुसले तेव्हा आल्या माझ्या त्या सार्‍या कविता
दु:खाचे औषध झाल्या माझ्या त्या सार्‍या कविता

मी किती लपविले सांगू संदर्भ तुझ्या प्रीतीचे
बडबडल्या सगळे साल्या माझ्या त्या सार्‍या कविता

कोणाचे कुणीच नसते वाटले मनाला जेव्हा
आम्ही आहोत म्ह्णाल्या माझ्या त्या सार्‍या कविता

आयुष्याच्या रूंदीची  चर्चा चालवली त्यांनी
पाठवल्या मीटरवाल्या माझ्या त्या सार्‍या कविता

जगताना जळलो इतके स्वप्नांचीच झाली राख
त्या राखेतून उडाल्या माझ्या त्या सार्‍या कविता

तुषार जोशी, नागपूर
२१ ऑगस्ट २०१२, १४:००
+९१ ९८२२२ २०३६५

रविवार, ५ ऑगस्ट, २०१२

किती तरी दिवसात

किती तरी दिवसात आपली
भेटच झाली नाही
रात्री अपरात्री घोटून
कॉफीच केली नाही
.
कांदे भजी खाता खाता
गप्पा रचल्या नाही
तुझ्या भावविभोर शब्दात
कविता सजल्या नाही
.
तार स्वरात वा~यावरती
सूर फेकले नाही
काहितरी करायला पाहिजे
असे ऐकले नाही
.
भटाबिटांच्या कवितांची पण
छेड काढली नाही
सगळे मिळून अरे वेड्या
पत्र वाचली नाही
.
किती तरी दिवसात लेका
तुला भेटलो नाही
शहाण्यासारखा वागत गेलो
वेडाच झालो नाही
.
.
तुषार जोशी, नागपूर

तुला पाहता

तुला पाहता जीव वेडावतो गं तुला पाहता
सुखाचा झरा का उरी वाहतो गं तुला पाहता?

तुझे केस सोडून ते मोकळे तू मला भेटता
उन्हाळ्यातही गारवा भासतो गं तुला पाहता

तुझा सावळा रंग आहे तुझा देखणा दागिना
मधाचा मधू गोडवा लाजतो गं तुला पाहता

तुझे हासणे ओतते धूंद तारूण्य चोहीकडे
पहा मंद वारा कसा नाचतो गं तुला पाहता

तुझे ओठ सांगून जाती मुक्याने हवे ते मला
जिवाचा शहारा पुरा पेटतो गं तुला पाहता

तुझे रूप वेधून घेते मनाला खुळ्या सारखे
तुझी साथ लाभो सदा मागतो गं तुला पाहता

तुषार जोशी, नागपूर
११ मार्च २०११, २२:५०

बुधवार, १८ जुलै, २०१२

रीत

संध्याकाळी ताजे
गुलाब घ्यावे म्हणतो.
तिच्या कुरळ बटांना
हळुच सजवावे म्हणतो
.
छोट्यासाठी लुडो
घेऊनच आलो आज
देईन आणि बघेन
त्याचा हर्षित नाच
.
धडाम वाजले काय
जाणवत नाही पाय.
आई, बाबा, माझी मनू
जन्म आठवला जणू
.
लोकल झाली माती
कितेक स्वप्ने मिटली.
हे जीवन संपवण्याची
तुझी रीत रे कुठली?
.
तुषार जोशी, नागपूर
२८ नोव्हेंबर २००७
+९१ ९८२२२ २०३६५

मंगळवार, १७ जुलै, २०१२

दुसरं प्रेम - २

माझ्या पहिल्या प्रेमाचे
पाहतो दुसरे प्रेम
किती यातना जिवाला
नियतीचा नाही नेम

अपघात झाल्यावर
कुणा सापडलो नाही
नव्हतीच किती दिस
आठवण कुणाचीही

आता आठवता सारे
बघा आभाळ फाटले
तिला तरूण देखणे
प्रेम दिसते भेटले

वाटे तिचा दोष काय
नियतीच करे खेळ
तिच्यावर कशासाठी
आणा परिक्षेची वेळ

सुखी रहा सखे राणी
देतो आशिष दुरून
जगेन मी आठवणी
जुन्या काळच्या स्मरून

तुषार जोशी, नागपूर
+९१ ९८२२२ २०३६५
१६ जुलै २०१२, २३:३०

दुसरं प्रेम

"माझं तुझ्यावर प्रेम आहे"
म्हणल्यावर लगेच म्हणाला
पण माझं लग्न आहे झालेलं.
"कंप्युटर" नावाच्या सवतीबरोबर
नांदायला तयार असशील
तर माझं हृदय मी कधिचं
आहे तुला दिलेलं.

हो म्हणून हसले
आणि… त्याचं
(दुसरं तं) दुसरं प्रेम
होऊन त्याची होऊन बसले.

तिच्याजवळ असला
की माझ्याकडे तो पाहतही नाही
तासंतास तिच्याशी
गप्पा मारण्यात सगळा वेळ जाई
माझ्याकुशीतून निघताच
सकाळी तिच्याकडे घेतो धाव
तरीही मला ही सवत
चालून जाते राव

ती फक्त वेळ मागते
हृदय मागत नाही
दुसरं प्रेम तर दुसरं पण
हृदयाने तर तो माझाच राही

तुषार जोशी, नागपूर
+९१ ९८२२२ २०३६५
१६ जुलै २०१२, २३:००

रविवार, १५ जुलै, २०१२

तुझ्या चांदण्याने

तू हसतेस आणि भरतेस
घराला तुझ्या चांदण्याने
तू उरतेस स्मरण होऊन
क्षणाक्षणाने कणाकणाने

तू बघतेस तुझ्या टपोऱ्या डोळ्यानी
चष्म्याच्या पारदर्षक काचांतून
माझ्यासाठी कवच ठरतेस सोडवतेस
मला जगाच्या खोचक जाचांतून
तुझे असणेच आश्वासन ठरते
जगण्याचे औषधा प्रमाणे

तू बसतेस जिथे टेकवतेस डोके
त्या जागा होतात माझे देव्हारे
तू नसतानाही त्या जागा असतात
माझे विसावण्याचे शांत किनारे
तुझ्या केसांचा गंध भेटतो
मला सुखाच्या अत्तराप्रमाणे

तुषार जोशी, नागपूर
+९१ ९८२२२ २०३६५
१५ जुलै २०१२, १२:५०

शुक्रवार, १३ जुलै, २०१२

तहान

तू अचानक म्हणालीस..
ए..
तुझी ती वाली कविता ऐकव ना
ती 'येतेस' वाली
माझ्या चेहऱ्यावर
अगणीत सूर्यांची झळाळी आली
एक झाल्यावर तुला दुसरी आठवली
मग तिसरी
आणि मी कितीतरी दिवसांनी
माझ्याच कवितांच्या आनंदात बुडलो
कवितांच्या अथांग आकाशात
तुझ्याबरोबर मनसोक्त उडलो
सुख फक्त कविता माझ्या हे नव्हते
त्या तुला फर्माईश करून
आवर्जून ऐकायच्या होत्या हे होते
जगाच्या रहाटगाडग्यात
आता कळतेय मी
किती रखडलेला होतो
अशी तृप्ती मिळाल्यावर कळले
किती दिवसांपासून मी…
तहानलेला होतो

तुषार जोशी, नागपूर
+९१ ९८२२२ २०३६५
१३ जुलै २०१२, २३:००

बुधवार, ११ जुलै, २०१२

भार झाला

जन्मतांच घरच्यांचे तोंड कडू
तास तास एकटीला देती रडू
मुलगी असणे असे तिचा दोष
साहते बिचारी सगळ्यांचा द्वेष
रडताना रडण्याचा वीट आला
पापण्यांना आसवांचा भार झाला

गोड धोड पण वाटलेच नाही
म्हणती जन्माला आली कशाला ही
मुलगा असता तं हवा होता
हुंडा जमवावा लागणार आता
अवकळा आली सगळ्या घराला
पापण्यांना आसवांचा भार झाला

जन्माला आली आहे ती जगेल
हळू हळू तिला प्रश्न पडतील
माझा काय दोष सांगा ती म्हणेल
कुणापाशी नीट उत्तर नसेल
निरागस असताना कष्ट तिला
पापण्यांना आसवांचा भार झाला

समाजाची रीत बदलावी कशी
निभवावी लागते जशिच्या तशी
वेगळे केले तं काळे फासतील
जिथे तिथे अडवून जाचतील
जगणे शरण त्या प्रवाहाला
पापण्यांना आसवांचा भार झाला

तुषार जोशी, नागपूर
११ नोव्हेंबर २०१०, २०:००
+९१ ९८२२२ २०३६५

अब समय मेरा है

अब समय मेरा है
कुछ भी कर सकता हूँ मैं, ये दावा सुनहरा है
अब समय मेरा है

मुसिबतों का डर नहीं चीरता चलूँगा मैं
आँधीयों के बाद भी यहीं खडा मिलूँगा मैं
मै चमकता सितारा हूँ जो अंधेरा घनेरा है
अब समय मेरा है

ये जग भर दूँगा मैं प्यार से विश्वास से
पिता सवाँरता है बच्चों की जिंदगी जैसे
सबको साथ रखने वाली मेरी विचारधारा है
अब समय मेरा है

तुषार जोशी, नागपुर
+९१ ९८२२२ २०३६५

गुरुवार, ५ जुलै, २०१२

गुन्हा

गोड मुलीशी ओळख केली
झाला एवढाच गुन्हा
सुचला कसा कुणास ठाऊक
असला शहाणपणा
.
एकटेपणा, कंटाळा हे
मित्र झाले परके
वाईट्ट मेले चांगले विचार
जवळ येतात सारखे
.
थोडं काही चुकलं तर
शिक्षा आहे ठरलेली
गोड बोलणी खावी लागतात
साखरेत बुडवलेली
.
पोरकेपणाची चांगली भावना
गेली मला सोडून
दुष्ट प्रेम ममता यांच्यात
गेलो पार बुडून
.
भुतासारखा मानगुटीवर
बसलाय बघा गुन्हा
इतकं झालं तरी करावा
वाटतो पुन्हा पुन्हा
.
तुषार जोशी, नागपूर
१७ फेब्रूवारी १९९७
+९१ ९८२२२ २०३६५

एक वादळ कधीचे

एक वादळ कधीचे
माझ्या अंतरात आहे
माझे शांत दिसण्याचे
वेड अतोनात आहे

किती धडपड धडपड
बाहेर येण्याची
माझी तारांबळ तारांबळ
येऊ न देण्याची
असे जळत जगणे
किती नशिबात आहे?
एक वादळ कधीचे
माझ्या अंतरात आहे

जग आनंद आनंद
कसे मोहर आलेले
कसे बोलू मनातले
मन वादळ झालेले
शांत निर्मळ जगाचा
काय अपराध आहे?
एक वादळ कधीचे
माझ्या अंतरात आहे

तुषार जोशी, नागपूर
+९१ ९८२२२ २०३६५

बुधवार, ४ जुलै, २०१२

व्यापार

सांगण्या साठी स्वतःचे जो दिसे, तैयार आहे
ऐकण्याची वेळ येता बंद पक्के दार आहे

आबरू ईमान प्रीती स्वस्त यांचे भाव झाले
चौकचौकातून चालू जाहला व्यापार आहे

बंगला नाही नसूद्या बांधुया केव्हातरी तो
तोवरी रस्त्यात साधा थाटला संसार आहे

तू इथे होतीस तेव्हा मी स्वतःतच गुंग होतो
आज तू नाहीस याला मीच जिम्मेदार आहे

जाणतो मी मद्य घेता जीवनाचा नाश होतो
वेदनेला घालवाया केव्हढा आधार आहे

तुषार जोशी, नागपूर
+९१ ९८२२२ २०३६५

रविवार, १ जुलै, २०१२

दागिना

आईच्या पदरा समान दुसरा आधार आहे कुठे
मायेचे धन लाभता धन गडी प्रासाद सारे थिटे
आईला बिलगून दूर पळते भीती कुठेच्या कुठे
आईगं म्हणताच शल्य विरते तृष्णा युगांची मिटे

बाबाच्या भवती घरात फिरणे याची मजा वेगळी
हट्टाला पुरवून रोज करतो साकार माझी खळी
रागाने वर पाहतो सहज मी खोडी कधी काढता
लाडाने समजावुनी शिकवतो अभ्यास ना त्रासता

मागावे तर काय सर्व जिनसा आधी मला लाभती 
आजारी पडता उशास बसती दोघेच ते जागती
मागा देइन प्राण, मात्र प्रिय मी हे छत्र देईन ना
भाग्याने असती महान सगळे ज्यांचा असा दागिना

हे सारे धन आठवून कसली ही वेदना सारखी?
सामोरी तर आश्रमात सगळी आई विना पोरकी

तुषार जोशी, नागपूर
+९१ ९८२२२ २०३६५
०१ जुलै २०१२, १२:००

शनिवार, ३० जून, २०१२

थांबू नको

तू पण कागदावर
काही खरडले होते ना?
शाळेत कॉलेजात मनातले
शब्दात उतरले होते ना?

पण ते जपून ठेवावेसे
तेव्हा वाटलेच नाही
आता इतर कविता वाचून
त्यांची जाणीव होई

वेळ गेलेला नाहीये गं
वेळ कधीच गेलेला नसतो
भावनेत भिजलेला शब्द
हमखास कविता असतो

लिही लिही बिनधास्त
लिही आता थांबू नको
कोण काय म्हणेल असले
विचार मनी आणू नको

साचलेलं सगळं ढवळ
कवितेत हो मोकळी
तोडून टाक तोडून टाक
संकोचाची साखळी

स्वतःची कविता वाचून
मन आनंदानं भरेल
कविता लिहिणे हाच
तुझ्यासाठी उत्सव ठरेल

खूश हो नाचून घे
दाखव किंवा लपव
आतापर्यंत राहीलेलं
कवितेत उत्कट साठव

कवितेला भेट गं
जवळ कर तिला
हरवलेले आणून देईल
ती तुझे सगळे तुला

तुषार जोशी, नागपूर
२८ जानेवारी २०१०

शुक्रवार, २९ जून, २०१२

सतत पुढे जा

सतत पुढे जा
तुझी वाट पाहत आहेत
शहरे प्रकाशाची
तुझ्या प्रगतीला सीमा आहे
फक्त आकाशाची

सतत पुढे जा
तुला नेहमी साथ आहेच
तुझ्या लोकांची
देवापुढे म्हटलेल्या
मंगल श्लोकांची

सतत पुढे जा
यशाच्या किर्तीच्या ही
पुढे पाऊल टाक
प्रेमाच्या सुगंधाने
जग व्यापून टाक

तुषार जोशी, नागपूर!
२९ जून २०१२, २२:००
+९१ ९८२२२ २०३६५

गुरुवार, २८ जून, २०१२

ठिणगी

तुझ्या रूपाची ठिणगी पडली
अश्शी काही हृदयातं
कहर घाली अश्शी काही हृदयातं
हृदय धडधड वाजतंय
वेड्यागत वागतंय गं
धावतंय वेगातं, धरू मी कसे, धावतंय वेगात

नको नको म्हटले तरी
भिजवीती आठवण सरी
ज्वर तुझ्या प्रीतीचा हट्टी
चढतोय वेगातं, थांबवू कसे, चढतोय वेगात

विसरलो देह मी भान
लागली ओढ बेभान
वेडा पतंग झाले जगणे
पेटलेय मस्तीतं, अडवू कसे, पेटलेय मस्तीत

तुषार जोशी, नागपूर
२८ जून २०१२, ०८:००
+९१ ९८२२२ २०३६५
(चाल: कुन्या गावाचं आलं पाखरू)

बुधवार, २७ जून, २०१२

ठिणगी

कौशल्याची ठिणगी तुझ्यात आहेच
फक्त प्रयत्नांचा वारा हवाय
कधी कधी मन खचतं डळमळतं
बळकट शब्दांचा मारा हवाय

ज्वाळा व्हायला आतुर असेल ठिणगी
सातत्याचा तिला आधार हवाय
पेटून आयुष्य लख्ख होईलच
निश्चय हवाय निर्धार हवाय

तुषार जोशी, नागपूर
 २७ जून २०१२, ०७:००
+९१ ९८२२२ २०३६५

शनिवार, २३ जून, २०१२

ढग डवरले

वर ढग डवरले
दिस पावसाचे आले
स्मरणांचे, भासांचे
वर ढग डवरले
दिस पावसाचे आले

पान पान हरकले
झाड मोहरून गेले
श्वांसांचे, गात्रांचे
पान पान हरकले
झाड मोहरून गेले

वेळ सुगंधित झाली
किती ओळखीची बोली
विरहाच्या विरण्याची
वेळ सुगंधित आली
किती ओळखीची बोली

तुषार जोशी, नागपूर
२३ जून २०१२, २२:४५
+९१ ९८२२२ २०३६५

बुधवार, २० जून, २०१२

आकाश दिलेस

तू आकाश दिलेस मला
मनमुक्त उडण्यासाठी
आणिक एक घर दिलेस
थकून कुशीत शिरण्यासाठी

आता थोडे थोडे सगळ्यांना
आकाश वाटत फिरतोय
ज्यांना घर नाही त्यांना
घर देण्याचे स्वप्न बघतोय

घरी वाट पाहतय कोणी
तू असा दिला विश्वास
मी फिरतोय खिन्न दिव्यात
भरत अता ज्योतींचे श्वास

तुषार जोशी, नागपूर
+९१ ९८२२२ २०३६५

कचरा

रस्त्यावरचा कचरा
फडा घेऊन झाडता येतो
गॅलरीत चहाचा झुरका घेत
सरकारला शिव्या देत
डोक्यातूनही काढता येतो

राहवत नाही ते झाडतात
आपल्या तत्वांची पणती जाळतात
गॅलरीत चर्चा करणारे
स्वच्छतेचा आव आणणारे
कोणी केला यावर भांडतात

तुषार जोशी, नागपूर
+९१ ९८२२२ २०३६५

टाळलेस कारे?

तू टाळलेस का रे
झाले उदास वारे

गाऊ नको पुन्हा तू
थंडावले निखारे

गर्दीत माणसांच्या
शोधू कुठे मला रे

माझे तुझे जमेना
ही ओढ खास का रे?

दाटून प्राण येतो
भेटून जात जा रे

तुषार जोशी, नागपूर
+९१ ९८२२२ २०३६५

सोमवार, १८ जून, २०१२

अप्रेज़ल टिप्स मामा

(खालील कविता निव्वळ विनोद निर्मिती साठी आहे.  कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी हिचा संबंध नाही.  तसा आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा.  इथे सांगितलेल्या युक्त्या वापरण्यास माझी अजिबात हरकत नाही.  पण त्याच्या परिणामांची जवाबदारी संपूर्णतः वापरणाऱ्याची राहील.  येथे नागपुरात प्रचलित असलेले काही वाक्यप्रयोग आणि शब्द आढळतील, व्याकरण तज्ञांनी उगाच व्याकरणाच्या चुका व शब्दांच्या चुका काढत बसू नये, काढल्यास इतरांनी सोईस्कर रित्या दुर्लक्ष करावे)

तुला सांगतो मामा अप्रेज़ल चे गुपित
प्रोजेक्ट मॅनेजर बसतो जेव्हा सोडा पीत
(सोडा म्हणायचे बरं, नायतर सेंसार होतो बाबा)
तर तुला सांगतो मामा, अप्रेज़ल चे गुपित
प्रोजेक्ट मॅनेजर बसतो जेव्हा सोडा पीत
मीही बसतो तेथे, सोडा मीपण घेतो
अन् हळूच त्याले ओढून झाडावरती नेतो
(हरबऱ्याच्या वो, थे कुठबी भेटते)तर मीही बसतो तेथे, सोडा मीपण घेतो
अन् हळूच किनई त्याले झाडावरती नेतो
मग म्हणतो मामा, तुमचीच नेहमी घासल्या जाते
मला कळते, मला याची जाणीव होते
(त्याला पटते, सोडा घेतल्यावर हो, पटते त्याला)
तर मी म्हणतो मामा, तुमचीच नेहमी घासल्या जाते
मला कळते हो, मला याची नेहमी जाणीव होते
मग मी करतो एक दोघाईले, उगाच बदनाम
त्याच्या मनावर होतो याचा गहिरा परिणाम
(कुनाले बी बदनाम करा, सोडा हायेच)
तर मी करतो एक दोघाईले उगाच बदनाम
त्याच्या मनावर होतो याचा गहिरा परिणाम
तो टाकतो माह्या गल्याभोवती हात
मग म्हनतो तुला मी ठेवीन नीट लक्षात
(एखादा हात चालवून घ्या लागते बा)तर तो टाकतो माह्या गल्याभोवती हात
मग म्हनतो तुला मी ठेवीन नीट लक्षात
तूच हाय मामा ज्याले माई कदर हाये
नायतर आजकाल लोकाईचे उलटेच असतात पाय
(सोडा काम करते झकास, प्रोजेक्ट मॅनेजर बोलू लागला का समजते)तर तो म्हणते तूच हाय मामा ज्याले माई कदर हाये
नायतर आजकाल लोकाईचे उलटेच असतात पाय
मग त्याले घ्यायचे आन नीट घरी सोडायचे
अप्रेज़ल च्या आदल्या रात्री गा.. मामाले हात जोडायचे
(आज तोच देव असतो बाबा, ...)
तर त्याले घ्यायचे आन नीट घरी सोडायचे
अप्रेज़ल च्या आदल्या रात्री मामाले हात जोडायचे
अप्रेज़ल च्या दिवशी त्याले आठवत काय नाय
इतकेच कडते त्याले का तुम्ही त्याचेच हाय
(सोडा सब्काँशस मध्ये पन काम करतो की वो)
तर अप्रेज़ल च्या दिवशी त्याले आठवत काय नाय
इतकेच कडते त्याले का तुम्ही त्याचेच हाय
मग तो शीट मध्ये धो धो पॉईंट्स देतो
आन तुमचा स्कोर आभाळात नेतो
(आता फक्त बघायचा हो बोलायचा काम नाय)
तर तो शीट मध्ये धो धो पॉईंट्स देतो
आन तुमचा स्कोर आभाळात नेतो
मग काय म्हनता मामा, खोटे वाटते का काय?
याच्या वरतीच तर इथे इतकी वर्षे टिकून हाय
(मी करू शकतो तर कुनी बी करू शकते बे)
मग काय म्हणता मामा, खोटे वाटते की काय
याच्या वरतीच तर कंपनीत इतकी वर्षे टिकून हाय
तुषार जोशी, नागपूर

नेहमीच वाटतं मला

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तू खूप खूप बोलावं
अन मी नुसतच हसावं
 
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
आणि तेव्हा जवळपास
अगदी कुण्णी कुण्णी नसावं
 
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
माझ्या एकटे पणानं
तुझ्या मागे लपुन बसावं
 
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
माझ्या आयुष्याचं स्वप्न
मला तुझ्या डोळ्यात दिसावं
 
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तो जवळ असल्याने
माझं जगणं फुलून यावं
 
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुला बघण्याच्या नादात
सगळं काही विसरून जावं
 
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तू असतांना डोळ्यांनी
आनंदाचं गाणं गावं
 
तुषार जोशी, नागपूर

रविवार, १७ जून, २०१२

तुझी आठवण आली

शुभ्र माऊचे गोंडस पिल्लू
घरभर पिंगा घाली
बघ तुझी आठवण आली
झाडे फुलली विश्वासाने
बिलगतात या वेली
बघ तुझी आठवण आली
वारा सुटला शिरली पिल्ले
हळूच पंखाखाली
बघ तुझी आठवण आली
कणाकणातुन तुझे प्रतिध्वनी
तुझे सूर भवताली
बघ तुझी आठवण आली
तुषार जोशी, नागपूर

आगपेटीची डबी

बाबा मी तुझ्यासाठी गम्मत आणलीय
काय गं चींटू माझ्यासाठी काय आणलं?
तिने हातात ठेवली आगपेटीची डबी
बाबा हे घे तुझ्यासाठी आकाश आणलं
.
माझ्यासाठी आकाश कुठे आहे ग दाखव?
हे काय डबीत बंद करून दिले ना तुला
मी अवाक झालो ती कल्पकता पाहून
अजून माझे हसू काही आवरे ना मला
.
माझं आकाश तिने माझा हातात दिले
ते बालगून मी तुफान भरारी घेतली
का कुणास ठाऊक पण तिच्या खेळाने
मला कधी न थकण्याची हुषारी दिली
.
तुषार जोशी, नागपूर
+९१ ९८२२२ २०३६५

श्रेय

दवबिंदू
तुझे पानावर असून
स्वतंत्र असण्याचे
मला कौतुक वाटायचे
.
हेच जगणे,
काय ते सौंदर्य!
सर्वात राहूनही
वेगळेपण गाठायचे
.
कमलदला
नंतर कळले मला
दवाच्या सौंदर्यात
अधिक श्रेय तुझे
.
तुझ्या आधाराने
फुलत गेले आहे
आकर्षक अस्तित्व
दवबिंदूचे
.
बाबा
आज मी स्वतंत्र आहे
दवबिंदू सारखा
सुंदर आणि सफल
.
बाबा
आज कळते आहे
माझ्या अस्तित्वा साठी
तू आहेस कमलदल
.
तुषार जोशी, नागपूर
+९१ ९८२२२ २०३६५

MAG 1848

MAG 1848 मागची सीट
पोटाला घट्ट धरलेला हात नीट
नेहमीचा वास बाबाच्या शर्टाचा
नीट बस रे मन्या झोपलास का?
.
बाबा गेला गाडी माझी झाली
मागची सीट कायमची सुटली
मागच्या सीटशी थबकतो आजही
आठवते ’मन्या’, शर्टाचा वासही
.
MAG 1848 बाबाची साथ
हा स्कूटर नव्हे मायेचा हात
एक घरचा सदस्य खूप जुना
जपतो माझ्या बाबाच्या खुणा
.
तुषार जोशी, नागपूर
+९१ ९८२२२ २०३६५

आवडतो रे

ए बाबा मला तू आवडतो रे
माझ्या सुखासाठी धडपडतो रे
.
हलकेच चलताना
सोडून देतो हात
अन माझ्या जगण्याची
करतोस सुरवात
अडखऴले तर पटकन सावरतो रे
ए बाबा मला तू आवडतो रे
.
शव्दा शव्दातुन तू
देतो मला शक्ती
तगण्याची चढण्याची
जागवतो आसक्ती
विस्कटले जर मी तू आवरतो रे
ए बाबा मला तू आवडतो रे
.
वृक्षासम वावरतो
देतो शीतल छाया
तू माझ्यावर करतो
आभाळासम माया
विजयात माझ्या तू मोहरतो रे
ए बाबा मला तू आवडतो रे
.
तुषार जोशी, नागपूर
+९१ ९८२२२ २०३६५

शुक्रवार, १५ जून, २०१२

खपली - ४

आता तिला वाटले होते
जखम जरा धरतेय खपली
काय झाले कळेचना
पुन्हा सगळी जिद्दच खपली

कशी बशी धीराची दोरी
प्रयत्नांना लावून कसली
तरी तिचा अंत बघण्याची
परिस्थितीची चेष्टा कसली

हारूनही पुन्हा कितीदा
डाव नेटाने ती चकली
तरीही फारच कमी मिळाली
तिला तिच्या यशाची चकली

तुषार जोशी, नागपूर
१५ जून २०१२, ०८:४५
+९१ ९८२२२ २०३६५

खपली - ३

फूलपाखरू उडते
मनी स्वप्नांची आरास
कोणीतरी टपलेला
हाती घेउनिया फास

साथ देता देता होतो
कसा विश्वासाचा घात?
विणलं रक्तानं तरी
कसं उसवतं नातं?

स्वप्न जायबंदी झालं
कसे कळेना तरेल
जगण्याच्या जखमेला
कधी खपली धरेल?

तुषार जोशी, नागपूर
१५ जून २०१२, ०१:००
+९१ ९८२२२ २०३६५

खपली - २

तू म्हणालास फोनवर
आता भागत नाही
फक्त एकदा भेट
मी जास्त मागत नाही

भेटल्यावर म्हणालास
एकदाच हात धरू?
मलाही आधार हवाच होता
कीती स्वतःला आवरू.

शब्दात मांडता येत नाही
सगळे तिथेच बघ अडते
म्हटलास ओठांची भाषा
आरक्त ओठांनाच कळते

तुझ्यावर विश्वास ठेवला
सगळे तुझेच ऐकले
खूप संयम पाळला मी
पण शेवटी तुला हरले

किती मोहरले मनात
किती स्वप्नात रंगले
जीव तुझा माझा एक
असेच गृहित धरले

त्या दिवसानंतर तू
मला सतत टाळत गेलास
फुसके काही कारण देऊन
सहज मोकळा झालास

माझा विश्वासच बसेना
चालेचना माझं डोक
कसे काम संपले की
चालू लागतात लोकं

वेळ जाईल  जखमेवर
काळाचेही औषध होईल
वरून जखम भरेल पण
खपली तर राहूनच जाईल

तुषार जोशी, नागपूर
१५ जून २०१२, ००:४०
+९१ ९८२२२ २०३६५

खपली - १

तू फुंकर घातलीस आणि
चटकन खपली धरली
तुझ्या सोबत असण्याने
जखम नकळत भरली

तुझ्या काळजीने मिळाल्या
फुलांच्या पायघड्या
निर्धास्त पणे घेता आल्या
स्वप्नांच्या मोठ्या उड्या

तूच माझे औषध होतास
वेदना जायच्या सरून
तूच दिलेली जखम आता
कशी रे काढू भरून?

तुषार जोशी, नागपूर
१५ जून २०१२, ००:००
+९१ ९८२२२ २०३६५

बुधवार, १३ जून, २०१२

गुपित

तुझ्या आठवणीला जपलं मी
हौशीने हृदयात माळलं
पण कुणाला कळू न देण्याचं
खूबीने मी पत्थ्य पाळलं

या जगाला समजेल कसा गं
संवाद तुझ्या माझ्या मधला
वेडेपणाचा कणकण आपण
दोघांनी जो मिळून जपला
कसं समजाऊ या जगाला सांग ना
फूल  ठेवलंय जे वहीत वाळलं

तुझ्या आठवणीला जपलं मी
हौशीने हृदयात माळलं
पण कुणाला कळू न देण्याचं
खूबीने मी पत्थ्य पाळलं

पाऊस आला की बाईकवरती
मुद्दाम घेतलेली ती वळणे
धडधडणारे काळीज बघुनी
नेमके विजेचे कोसळणे
सगळी गोष्ट सांगताना ही
तुझं नाव नेमकं गाळलं

तुझ्या आठवणीला जपलं मी
हौशीने हृदयात माळलं
पण कुणाला कळू न देण्याचं
खूबीने मी पत्थ्य पाळलं

नजरा नजर झाली जर असती
यायची गालावर लाली
कळावी का सगळ्या लोकांना
आपल्या सहज प्रीतीची खोली
नजरेला टाळून पुन्हा मी
आपलं गोड गुपित सांभाळलं

तुझ्या आठवणीला जपलं मी
हौशीने हृदयात माळलं
पण कुणाला कळू न देण्याचं
खूबीने मी पत्थ्य पाळलं

तुषार जोशी, नागपूर
१३ जून २०१२, २३:००
+९१-९८२२२-२०३६५

सोमवार, ११ जून, २०१२

प्रिया भेटली तो दिवस अजून आठवतो

प्रिया भेटली तो दिवस
अजून आठवतो
खिन्न रहायची सगळं काही
संपलय म्हणायची
.
विश्वासघाताच्या ओझ्याखाली
दबून रहायची
त्याची आठवण अनावर होऊन
भळभळ रडायची
.
प्रिया भेटली तो दिवस
अजून आठवतो
हसून दाखवायची शहाण्यासारखं
वागून दाखवायची
.
प्रिया भेटली काल पुन्हा
मला म्हणाली
जगतेच आहे नवी स्वप्ने
बघते आहे
.
त्याला क्षमा नाही करू
शकले आहे
मन रमवून विसरायचे
तरी बघते आहे
.
प्रिया भेटली काल पुन्हा
मला म्हणाली
वेल होते मी आता वृक्ष
बनते आहे
.
तुषार जोशी, नागपूर

शेवटची भेट

आज तुला शेवटची भेटायला आलेय.
तुझ्या मैत्रीच्या सर्व आठवणींची
आज मी समग्र मूर्ती झालेय.
आज तुला शेवटची भेटायला आलेय.

हो रे! कुणाला न सांगता, लपुन छपुन.
तुझ्याशी भेटण्याचं मनात आलं
आणि तडक आलेय निघून.
हो रे! कुणाला न सांगता, लपुन छपुन.

या नंतर असे येता येणार नाही.
संसाराची गाडी ओढताना
हे समजून घ्यावे लागेल तुलाही.
या नंतर असे येता येणार नाही.

मैत्रिणीची आठवण ठेवशील ना?
दोघेही व्यवहारात रमल्यावर
माझी विचारपूस करशील ना?
मैत्रिणीची आठवण ठेवशील ना?

ही माझ्या लग्नाची पत्रिका.
चार दिवसांनी तुझी बायको झाल्यावर
आतल्या मैत्रिणीला विसरायचं नाही बरका!
ही माझ्या लग्नाची पत्रिका.

तुषार जोशी, नागपूर
+९१-९८२२२-२०३६५

रविवार, १० जून, २०१२

सोनेरी पान

तो पहिला फोन
तू विचारलेस, काय करतेस?
काही नाही, अशीच बसले होते
काय बोलावे कळेनासे झाले होते
मग काका काय म्हणाले, मावशीने काय कमेंट केला
हेच बोलण्यात गेला सगळा, वेळ उरलेला

मग
तो पहिला सिनेमा
पहिलीच चक्कर, तुझ्या स्कूटर वर
हात कमरेवर ठेवू की खांद्यावर?
खांद्यावर ठेवताना हाताची थर थर
हृदयाने किती बरे व्हायचे खाली वर?

मग
ती पहिली कॉफी
चर्चा, प्रियांका चोपडा अशी का वागते?
लग्न ठरल्यावर, कॉफी; खरंच वेगळीच लागते

मग
पहिला निरोप
त्याआधी दाखवलेले घर, आणि गच्ची
मनापासून हो म्हटले आहेस न? तुझा प्रश्न
पहिला हातात हात आणि माझं लाजणं
तू दिलेली "गोड" भेट आणि रात्र भर जागणं

माझ्या डायरीचं...
हे सोनेरी पान
माझं लग्न ठरलंय, कित्ती छान!
एक माणूस आवडल्याचे, मनापासून समाधान
माझ्यासारखी मीच भाग्यवान
माझ्यासारखी मीच गं (टच वूड) भाग्यवान

- तुषार जोशी, नागपूर
१८ आगस्ट २००६

शनिवार, ९ जून, २०१२

कधी कधी

मनास आवरू किती? सतावते कधी कधी
न ऐकते, हवे तसेच वागते कधी कधी

कळे न नेहमी तिथे कशी पहाट होतसे
नशीब आमचे इथे उजाडते कधी कधी

तिच्या घरा समोर मी पडीक नित्य राहतो
कळे लपून ती हळूच पाहते कधी कधी

नको करूस फोन तू नको निरोप पाठवू
तहान मिस्ड कॉलनेच भागते कधी कधी

जपून 'तुष्कि' शब्द तोल बोल काळजातले
तुझी गझल बघून आग लागते कधी कधी

~ तुष्की

नागपूर
०९ जून २०१२, २०:००

बुधवार, ६ जून, २०१२

वादळे

वेड्यापिश्या झुंझारतेने रोखली मी वादळे
पेल्यात माझ्या दाटलेली झोकली मी वादळे

आम्ही फुलांचे स्वप्न नाही पाहिले ऐसे नव्हे
नाही कधी जुळले फुलांशी, माळली मी वादळे

काहीतरी देऊन जावे मागणी झाली जिथे
माझ्याकडे खेळायची ती सोडली मी वादळे

व्हावी तशी आरास काही होईना मांडू कशी
हातातली आताच सगळी ओतली मी वादळे

झोपायला जमतेच ना स्वप्ने कशी पाहू तुझी
कंटाळुनी आता उशाला आणली मी वादळे

तुषार जोशी, नागपूर
२० एप्रिल २०११, ०८:३०

तो बोलतो न काही

भारीच त्रास देतो तो बोलतो न काही
मौनास वीट येतो, तो बोलतो न काही

शब्दात प्रीत माझी सांडून वाहताना
डोळ्यास अर्थ देतो, तो बोलतो न काही

मी मागते कितीदा ते शब्द काळजीचे
बागेत रोज नेतो, तो बोलतो न काही

स्वप्ने किती बघू मी बोलेल आज राजा
स्पर्शात जीव घेतो, तो बोलतो न काही

ते काल बोलताना तू पाहिलेस ज्याला
माझा सखा नव्हेतो, तो बोलतो न काही

तुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)
२१ आक्टोबर २०१०, ००:००

मंगळवार, ५ जून, २०१२

आरसा

एक पोर काळे झाले
एक पोर गोरे
प्रेम सारखे आईचे
दोन्ही तिची पोरे

दोघांनाही आई दूध
पाजतेच ना हो
एकसारखेच लाड
करतेच ना हो

नको मग कवितेला
चौकटीत ओढू
हसावे की रडावे
हे तिच्यावर सोडू

कवितेला रडावेसे
वाटलेच कधी
वेदनेत कण्हावेसे
वाटलेच कधी

तेव्हा तेव्हा होऊ द्यावे
तिला वेडे पिसे
शब्दामध्ये विणावेत
अश्रू आहे तसे

रडू नको, उपदेश
तेव्हा देऊ नये
आशेचेही गालबोट
तिला लावू नये

कवितेने का असावे
नेहमीच पक्कं
मोकलून रडण्याचा
तिला सुद्धा हक्क

सुखामध्ये जशी तीच
सोबत करते
दुःखी क्षणांचाही तीच
आरसा असते

तुषार जोशी, नागपूर
२८ जानेवारी २०१०

तिला हसताच येत नाही

तिला हसताच येत नाही,
कारण ती स्वतःवरच रूसलीय.
दार घट्ट बंद करून ..
स्वतःला कोंडून बसलीय.
.
पाऊस म्हणाला ये ना भीज,
थेंब अंगावर घे ना प्लिज.
तेव्हा म्हणाली तू नाहीस माझ्यासाठी,
मला नाही सोसायची तुझी मिठी.
.
आरसा म्हणाला बघ बघ जरा,
किती सुंदर दिसतोय चेहरा.
तेव्हा म्हणाली पुरे कौतुक तुझे,
लोकांनी सांगितलेय मी कशी दिसते ते.
.
लोकांनी केलेल्या वर्णनाइतकेच
स्वतःचे अस्तित्व ठरवून फसलीय.
दार घट्ट बंद करून ...
स्वतःला कोंडून बसलीय
.
.
तुषार जोशी, नागपूर

स्तुती

"कविता मला कळत नाहीत,
तू केल्या म्हणून वाचतोय",

म्हणताना ती गोजिरवाण्या
मुलासारखा चेहरा करायचास;
आणि स्वतःच माझ्यासाठी
एक कविता ठरायचास
.
"मला कविता का नाही कळत गं?"
तुझ्या प्रश्न नेहमीचा;
पण निरागस तुझा चेहरा पाहून
तुला कविता कळत नाही
याचा विसरच पडायचा.
.
त्याच भरात तुला हट्टाने
नवी कविता ऐकवायची
.
"वा सुंदर आहे! खूपच सुंदर!"
तू म्हटल्यावर मी विचारायचं
"आवडली? कळली कविता?"
.
तू म्हणायचंस
"हॅट, ही स्तुती तुझ्या चेह~याची
तन्मयतेची..
तुझ्या बंद डोळ्यांची.
तुझ्या सारखी कविता समोर असताना
गरज काय
दुसरं काही कळायची?
"
.
.
तुषार जोशी, नागपूर

सोमवार, ४ जून, २०१२

मनाची कविता

मी हरलो म्हणू नकोस
यावेळी हरलोय म्हण
पुन्हा जग जिंकण्यासाठी
येतील कितीतरी क्षण

एकटा उरलो म्हणू नकोस
सध्या एकटा आहे म्हण
आयुष्य संपले नाही अजून
भेटतील किती तरी जण

मी थकलो म्हणू नकोस
जरा दम घेतोय म्हण
पुन्हा झेप घेण्यासाठी
पेटून उठेल एकेक कण

तुषार जोशी, नागपूर
१७ आगस्ट २०१०, ०९:००

रविवार, ३ जून, २०१२

उड जा पुढे

धमन्यातून सळसळ रक्त नवे
चैतन्यच अंकुरले हिरवे
अंधार कधीचा फिटला हो
ध्येयाचा चेहरा दिसला हो
भिड जा पुढे
भिड तू रे गड्या
उड जा पुढे
उड तू रे गड्या

आला जर पर्वत तर त्याला
शक्ती आहे सर करण्याची
वर चढण्याची युक्ती लावू
अथवा त्याला पोखरण्याची
भय कसले संशय कुठला हो
निश्चय जाहिर सांगितला हो
चढ जा पुढे
चढ तू रे गड्या
उड जा पुढे
उड तू रे गड्या

करकचून ताणू जिद्दीला
दणदणून सोडू जगताला
चंद्राची माथ्यावर बिंदी
केसातुन माळू सूर्याला
प्रयत्नाचा गुण पटला हो
अंगात यशोज्वर ऊठला हो
लढ जा पुढे
लढ तू रे गड्या
उड जा पुढे
उड तू रे गड्या

तुषार जोशी, नागपूर

गुरुवार, ३१ मे, २०१२

कुणी अर्थ देता का अर्थ

कुणी अर्थ देता का अर्थ

मित्रांनो..
आता कविता अडखळली आहे
रदिफ अलामत काफियांच्या गराड्यात
अडकून कोरडी पडली आहे
तांत्रिक दृष्ट्या तरबेज असूनही
वजनामधे ढळली आहे

कोणी अर्थ देता का अर्थ..

कवितेला हवाय
आता गंध
आतून येणाऱ्या संवेदनेचा
आणि एक ओलावा हवाय
भावनांच्या शिडकाव्याचा
याला त्याला उत्तरे देण्यात
माझी कविता गुंतली आहे
बोनसाय होऊन, आपलाच तोरा
मिरवताना खुंटली आहे

कोणी अर्थ देता का अर्थ…

वाचल्यावर काटा येईल
असा एक विषय हवाय
पाणी डोळा काठी येईल
असा उदात्त आशय हवाय
तिला वाचताच
हृदयाच्या आतून दाद द्यावी लागेल
असा प्रभाव ज्याचा परिणाम
हृदयाचा ठोका मागेल

मित्रांनो
त्याच त्याच साच्यात फिरून
कविता थकली आहे
काहीच कळेनासे होऊन
मटकन खाली बसली आहे..

कुणी अर्थ देता का अर्थ…

तुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)
३१ मे २०१२, ००:३०

बुधवार, ३० मे, २०१२

संपली परीक्षा

संपली परीक्षा निकालास
आहे अवकाश अजून
मुक्त श्वास घेण्याची आली
वेळ सावकाश सजून

कितीतरी छंद मनाचे
पुरते होतील आता
राहून गेलेल्या स्वप्नांच्या
येईल मागे आता जाता
साखर झोप पहाटे अलगद
दुलई डोक्यावर ओढून

संपली परीक्षा निकालास
आहे अवकाश अजून
मुक्त श्वास घेण्याची आली
वेळ सावकाश सजून

फुटाळ्याच्या** काठावर
मिळतील काही तास अधिक
रोज सण स्वातंत्र्याचे
घडतील आपसूक
पुस्तकांना सिनेमांना
भेटी मित्रांना घेऊन

संपली परीक्षा निकालास
आहे अवकाश अजून
मुक्त श्वास घेण्याची आली
वेळ सावकाश सजून

(फुटाळा** - हे नागपुरचे नरिमन पॉईंट आहे)

तुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)
३० मे २०१२, ०९:००

मंगळवार, २९ मे, २०१२

ओढ मनाची

केव्हाच तिला मी
ही ओढ मनाची माझ्या
ही प्रीत अनावर
सांगत नाही

पण डोळ्यांना डोळे भिडले की गरज कशाची
राहत नाही

साठवतो मी
ते रूप तिचे हृदयात
आठवतो मी
ते कितेकदा दिवसात
मी हसतो फुलतो झुलतो घेऊन तिच्या गंधाचा श्वासात छंद
मी रूसतो जळतो झुरतो साहून तिच्या नसण्याची वेदना मंद
समोर आल्यावर ती
पाहण्यात जातो वेळ
कोणतेच शल्य
उरत नाही

केव्हाच तिला मी
ही ओढ मनाची माझ्या
ही प्रीत अनावर
सांगत नाही

पण डोळ्यांना डोळे भिडले की गरज कशाची
राहत नाही

ती आहे इतकेच
पुरते मला जगण्याला
तिचे हसणे बस
पुरते मला फुलण्याला
मी रमतो सुचतो रचतो शब्दात तिच्या असण्याचे भावूक गाणे
मी भिजतो रुजतो अंकुरतो घेऊन तिच्या भासांचे धुंद तराणे
ती आल्यावर पण
क्षण क्षण जपता जपता
निसटून जातो
पुरत नाही

केव्हाच तिला मी
ही ओढ मनाची माझ्या
ही प्रीत अनावर
सांगत नाही

पण डोळ्यांना डोळे भिडले की गरज कशाची
राहत नाही

तुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)
२९ मे २०१२, ०९:००

रविवार, २७ मे, २०१२

खुळा झालो गं

वेड लागलेय मला खुळा झालो गं
खुळा झालो सावळ्या रंगावर
तू येशील भेटायला म्हणालीस
मी खूश आता माझ्याच भाग्यावर

पाहिले मी तुला लोकलमधे
मोकळे सोडून केस कुरळे
वाटले तिथेच मिळाली दुनिया
संपले क्षणात शोध सगळे
योगायोग म्हणू कसा गं सांग ना
मी बनलोय तुझ्याच साठी खरं
.
वेड लागलेय मला खुळा झालो गं
खुळा झालो सावळ्या रंगावर
तू येशील भेटायला म्हणालीस
मी खूश आता माझ्याच भाग्यावर

नाव तुझं मनात घिरट्या घालतं
लिहावं किती बघत रहावं किती
चित्त तुझ्या विचारांमागे धावतं
तुला क्षणोक्षणी स्मरावं किती
तू येशील म्हणून जपून ठेवलं
गुलाबाचं बघ फूल हसरं गोजिरं
.
वेड लागलेय मला खुळा झालो गं
खुळा झालो सावळ्या रंगावर
तू येशील भेटायला म्हणालीस
मी खूश आता माझ्याच भाग्यावर

~तुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)
२७ मे २०१२,१९:३०

रविवार, १३ मे, २०१२

पिल्लू

भेटीस माऊलीच्या
आसावले कधीचे
पिल्लू कुण्या अभाग्या
घायाळ पक्षिणीचे
.
डोळ्यात रोज पाणी
आणूनिया पहाते
जेव्हा कुणाचि आई
पिल्लू कुशीत घेते
.
असल्या किती पिलांना
आईचि भेट नाही
म्हटली कधीच नाही
साधी कुणी अंगाई
.
होतो जराशि आई
डोळे करूण स्मरतो
भेटीस त्या पिलांच्या
मी आश्रमात जातो
.
.
तुषार जोशी, नागपूर
(१५ मार्च २००९, टेरीटाऊन)

माझी आई

मायेची गोड गोड
हाक माझी आई
छोटेसे गोल गोल
नाक माझी आई
.
गुरगुट्टा मऊ ताक
भात माझी आई
केसातून फिरणारा
हात माझी आई
.
तत्वांचे धारदार
टोक माझी आई
भीती घालवणारा
श्लोक माझी आई
.
.
तुषार जोशी, नागपूर
(१७ मार्च २००९, टेरीटाऊन)

कोण येतं फुंकर मारायला?

जग नेहमी बदलत असतं
बदलत नसतं ते प्रेम असतं
असं प्रेम कोण करतं?
आपल्यासाठी कोण झुरतं?
दुखलं खुपलं औषध लावायला
कोण येतं फुंकर मारायला?
सर्वात पहिले येते आई
विनाशर्त प्रेम करायला

ऱ्हास नसतो आईच्या छायेला
अंत नसतो आईच्या मायेला

आई नेहमी मर्जी राखते
सोन्या रूसला रागवला तरी
नेहमी ईतकीच काळजी करते
घरासाठी दिवसरात्र
आई आपली कामात असते
आईच्या धावपळीमुळेच
घर आरामत असते
सोन्या चुकला की रागवते
पण क्षमा करते प्रत्येक वेळेला

ऱ्हास नसतो आईच्या छायेला
अंत नसतो आईच्या मायेला

आई आणि ममता
हे नातं अतूट असतं
आई आणि ममता
याहून मोठं कुणीच नसतं
मोठ्यात मोठ्या माणसाला
देखील हवी असते आई
विच्च्ारे गरीब गरीब असतात
ज्यांच्याजवळ नसते आई
बाकी सगळे गर्भश्रीमंत
हात आईचा ज्यांच्या पाठीला

ऱ्हास नसतो आईच्या छायेला
अंत नसतो आईच्या मायेला

तुषार जोशी, नागपूर

मंगळवार, १ मे, २०१२

जिद्द

जिंकण्याची जिद्द आहे हारलो आधी जरी,
ध्यास नाही सोडला
मी प्रयत्नांचा सरावाचा सुकाणू घेऊनी
मार्ग माझा शोधला

एकटा झालो तरीही दुःख ना केले कधी
एकट्यांना शोधले
हासण्याचा मंत्र त्यांना देऊनी आलो किती
मित्र सच्चे लाभले

वाटले आकाश, जेथे कोंडलेली पाहिली
कोवळी स्वप्ने किती
ज्या क्षणी झाली तयारी झेप घेण्याची नभी
लाभल्या साऱ्या मिती

जे मिळाले तेच घेवोनी पुढे चालायचे
जाणले मी नेहमी
जे मिळाले ना मला हव्यास त्याचा सोडला
तृप्त 'तुष्की' आज मी

~ तुष्की (+९१ ९८२२२ २०३६५)

नागपूर
०१ मे २०१२, १९:१५