मंगळवार, २९ मे, २०१२

ओढ मनाची

केव्हाच तिला मी
ही ओढ मनाची माझ्या
ही प्रीत अनावर
सांगत नाही

पण डोळ्यांना डोळे भिडले की गरज कशाची
राहत नाही

साठवतो मी
ते रूप तिचे हृदयात
आठवतो मी
ते कितेकदा दिवसात
मी हसतो फुलतो झुलतो घेऊन तिच्या गंधाचा श्वासात छंद
मी रूसतो जळतो झुरतो साहून तिच्या नसण्याची वेदना मंद
समोर आल्यावर ती
पाहण्यात जातो वेळ
कोणतेच शल्य
उरत नाही

केव्हाच तिला मी
ही ओढ मनाची माझ्या
ही प्रीत अनावर
सांगत नाही

पण डोळ्यांना डोळे भिडले की गरज कशाची
राहत नाही

ती आहे इतकेच
पुरते मला जगण्याला
तिचे हसणे बस
पुरते मला फुलण्याला
मी रमतो सुचतो रचतो शब्दात तिच्या असण्याचे भावूक गाणे
मी भिजतो रुजतो अंकुरतो घेऊन तिच्या भासांचे धुंद तराणे
ती आल्यावर पण
क्षण क्षण जपता जपता
निसटून जातो
पुरत नाही

केव्हाच तिला मी
ही ओढ मनाची माझ्या
ही प्रीत अनावर
सांगत नाही

पण डोळ्यांना डोळे भिडले की गरज कशाची
राहत नाही

तुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)
२९ मे २०१२, ०९:००

1 टिप्पणी:

ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: