मंगळवार, ५ जून, २०१२

आरसा

एक पोर काळे झाले
एक पोर गोरे
प्रेम सारखे आईचे
दोन्ही तिची पोरे

दोघांनाही आई दूध
पाजतेच ना हो
एकसारखेच लाड
करतेच ना हो

नको मग कवितेला
चौकटीत ओढू
हसावे की रडावे
हे तिच्यावर सोडू

कवितेला रडावेसे
वाटलेच कधी
वेदनेत कण्हावेसे
वाटलेच कधी

तेव्हा तेव्हा होऊ द्यावे
तिला वेडे पिसे
शब्दामध्ये विणावेत
अश्रू आहे तसे

रडू नको, उपदेश
तेव्हा देऊ नये
आशेचेही गालबोट
तिला लावू नये

कवितेने का असावे
नेहमीच पक्कं
मोकलून रडण्याचा
तिला सुद्धा हक्क

सुखामध्ये जशी तीच
सोबत करते
दुःखी क्षणांचाही तीच
आरसा असते

तुषार जोशी, नागपूर
२८ जानेवारी २०१०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: