शनिवार, ३० जून, २०१२

थांबू नको

तू पण कागदावर
काही खरडले होते ना?
शाळेत कॉलेजात मनातले
शब्दात उतरले होते ना?

पण ते जपून ठेवावेसे
तेव्हा वाटलेच नाही
आता इतर कविता वाचून
त्यांची जाणीव होई

वेळ गेलेला नाहीये गं
वेळ कधीच गेलेला नसतो
भावनेत भिजलेला शब्द
हमखास कविता असतो

लिही लिही बिनधास्त
लिही आता थांबू नको
कोण काय म्हणेल असले
विचार मनी आणू नको

साचलेलं सगळं ढवळ
कवितेत हो मोकळी
तोडून टाक तोडून टाक
संकोचाची साखळी

स्वतःची कविता वाचून
मन आनंदानं भरेल
कविता लिहिणे हाच
तुझ्यासाठी उत्सव ठरेल

खूश हो नाचून घे
दाखव किंवा लपव
आतापर्यंत राहीलेलं
कवितेत उत्कट साठव

कवितेला भेट गं
जवळ कर तिला
हरवलेले आणून देईल
ती तुझे सगळे तुला

तुषार जोशी, नागपूर
२८ जानेवारी २०१०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: