शनिवार, २७ जुलै, २०१३

निराळा

रंगांमध्ये निराळा सतत प्रिय मला सावळा रंग वाटे
रंगाने या प्रियेची वदन मधुरता वाढते रम्य होते
माझ्यासाठी प्रभूने अढळ बनवला रंग हा शामवर्णी
प्रेमाने खास त्याने अविरत श्रमुनी कोरली गोड लेणी

हास्याने लुब्ध व्हावे सहजच हसता प्रेयसी सावळी ती
जेव्हा गाली सजावी अवखळ गहिरी साजरीशी खळी ती
वाटे जेव्हा उदासी क्षणभर बघणे आणते प्राण देही
वाहे वारा सुगंधी दिवसभर कसा भासश्वासात राही

वर्णू गोडी किती मी लिहुन थबकलो मावतो गोडवा ना
शब्दांमध्ये बसे ना रूसुनच बसला केवढा दुष्ट कान्हा
या श्रीरंगा वरी मी मनभर लिहिणे वाटते नित्य व्हावे
जेव्हा जेव्हा लिहावे परत परत मी सावळीला लिहावे

~ तुष्की
नागपूर, २७ जुलाई २०१३, २०:४५
(वृत्त: स्रग्धरा .. उदा: ध्यायेदाजानु बाहू धृतशरधनुषं बद्ध पद्मा सनस्थं )

बुधवार, २४ जुलै, २०१३

टिटवी ला टिवटिव करते

ही टिटवी का टिवटिव करते?
ही टिटवी का टिवटिव करते?

काळजाची होई घालमेल
काय रात्रीच्या गर्भी असेल
डोळा लवतोय चिंता मनाला
समजावू मी कसे कुणाला
प्रीत माझ्या मनी हुरहुरते
ही टिटवी का टिवटिव करते?

साज शिनगार बसले सजून
भेटाया तो ना आला अजून
फोनवर भासला त्रासलेला
घोर त्याच्या नसूदे जिवाला
पाल भिंतीवरी चुकचुकते
ही टिटवी का टिवटिव करते?

~ तुष्की
नागपूर, २४ जुलाई २०१३, ०९:३०

शुक्रवार, १२ जुलै, २०१३

ऋण

त्या दिवशी
त्या धुंद मिठीत
तू ओठांचे अर्धेच भास ठेवून गेलेलीस
ते भास घेऊन
मी काळवाटेवर
अजूनही त्याच ग्लानीत जगतो आहे
कोण्या एका वळणावर पुन्हा
आपली भेट होईलच
तुझ्या ओठांचे
ऋण फेडण्यासाठी
हा ध्यास नाही
हा विश्वास आहे
कारण..
दोघांनाही सारखेच वाटणे
इच्छेला विश्वासात बदलत असते

~ तुष्की
नागपूर, १२ जुलाई २०१३, ११:००

पहिला पांढरा केस पाहुन

(रांगोळी घालताना पाहून, ही केशवसुतांची कविता सर्वश्रुत आहे.  त्या काळचे कवी अमूक अमूक करताना पाहून या स्टाईल च्या कविता लिहायचे, तशाच शैलीत आपणही काही लिहावे असे अनेकदा मनात विचार आला होता.  गप्पागटावर स्वाती शुक्ल यांनी एक प्रश्न विचारला त्याच्या अनुषंगाने माझी ही इच्छा आज पूर्ण झाली असे वाटते.)

पहिला पांढरा केस पाहुन

केस पहिला पाहून
शुभ्रधवल रेशमी
वाटे तारूण्याची वेस
पार झाल्याची बातमी

किंवा दूत तो एखादा
आला पुढे सगळ्यांच्या
प्रौढ जाणिवांची शाल
गळा घालण्यास माझ्या

अता अजून येतील
सांगतो तो चिडवून
अनुभवाची मोजणी
होते त्याच्याच पासून

तो आल्याचे दुःख नाही
काय हरवले ना चिंता
सुटला कुणास आहे
काळचक्राचा हा गुंता

स्वागत करतो त्याचे
त्यास देतो मी अभय
पाहुणा मानावा देव
अशी आमची सवय

~ तुष्की
नागपूर, १२ जुलाई २०१३, ०९:३०

शनिवार, ६ जुलै, २०१३

असा बेभान हा वारा

असा बेभान हा वारा
सोबतीला आसंमंत सारा
धुंद रात ही सूर ही मंद हा
मोहतो मना गंध हा
वाटतो हवा बंध हा

(~ निखिल महामुनी)

जाणिवा किती अंतरी दाटल्या
भेटती नव्याने दिशा आतल्या
पान हालते वृक्ष ही डोलती
काजवे जणू चांदण्या खालती
सांगती मला थांब येथे जरा
मांडुनी हा स्मरण पसारा

रातराणीची हाक बागेतुनी
प्रीत वाहते रोमरोमातुनी
श्वास दाटले भास गंधाळले
चित्त लाजले स्पर्ष रोमांचले
लाट होऊनी भेटतो मोगरा
चिंबतो हा हृदय किनारा

आज वाटते धुंद वाऱ्यासवे
मेघदाटुनी रिक्त व्हाया हवे
घट्ट राजसी आठवावी मिठी
काळजामधे साठवावी दिठी
मंद हासतो छेडतो गोजिरा
ओळखीचा कुणी एक तारा

(~ तुष्की
नागपूर, ६ जूलाई २०१३, ११:००)