शुक्रवार, ९ जानेवारी, २००९

मठ्ठ आहेस रे

.
.
तू मठ्ठ आहेस रे
असं म्हणायचीस
जीव जडलेला असल्याने
ते पण गोड वाटायचे
.
मग आम्ही तुझ्यासमोर
नवे नवे उद्योग करून
ते पुन्हा ऐकण्यासाठी
मठ्ठ वागून दाखवायचे
.
किती वर्षे झाली गं
खळखळून हसलो नाही
एकदा तू मठ्ठ आहेस
इतके म्हणायला तरी ये
.
तुषार जोशी, नागपूर

तू

.
.
तू
एकांतात
गालातल्या गालात
हसण्याचे कारण
तू
.
तू
गुरगुट्टा भात
भरपूर तुपात
अन साधं वरण
तू
.
तू
पावलो पावली
तुझीच सावली
सुगंधी स्मरण
तू
.
तुषार जोशी, नागपूर
११ आक्टोबर २००८

तुला पहिल्यांदा पाहिले ना

.
.
तुला पहिल्यांदा पाहिले ना
तेव्हाच कळले तू म्हणजे
जादूगार,खळखळणारे हसू पसरवणारी
.
तुला भेटत गेलो नंतर 
तेव्हा कळले तू ज्योत आहेस
उदासिनतेच्या अंधाराचा नाश करणारी
.
तुला समजत गेलो आणि
तेव्हा कळले तू नुसते असणे
म्हणजेच प्रसन्नता आयुष्य खुलवणारी
.
तुषार जोशी, नागपूर
.

गुरुवार, ८ जानेवारी, २००९

का गं?

.
.
त्याला पांढरी फुले आवडतात
तू समजू शकशील का गं?
सांगत नाही मनात ठेवतो
ते ऐकू शकशील का गं?
.
सध्या तुझ्या मागे धावतोय
तुला खूश बघायचय त्याला
त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी
तू हळूच टीपशील का गं?
.
कधी आरडाओरड करेल
तुला बोलेलही कदाचित
पण मनाने हळवा आहे
हे लक्षात ठेवशील का ग?
.
तुषार जोशी, नागपूर
.

टचं-टचं बोललीस

.
.
टचं-टचं बोललीस
किती टोचलीस मला
काटेरी झालीयेस ग
कसं सहन होतं तुला
.
मला त्रास होतो ना
तुझ्या बोलण्याचा
किती त्रास होत असेल
आतून तुलाही त्याचा
.
स्वतःची अन तुझी
काळजी घेईन आता
विश्वासाने गळून पडेल
एकूण एक काटा
.
टचं टचं बोललीस पण
तूच कौतुक करशील
गुणाची माझी पोर गं
लाडाने तूच म्हणशील
.
तुषार जोशी, नागपूर
.

प्रतिभेचा स्वामी

.
कविता झाली की आपण
परतुन देही येतो
शब्दाशब्दातून तो
अस्तित्व जाणवुन देतो
.
कौतुकाने वाचतो
आपण लिहिलेली कविता
दाद निघते सहज
त्या लिहिणा~या करता
.
किती कलंदर आहे
कविते पुरता येतो
तो प्रतिभेचा स्वामी
कविता करवून घेतो
.
तुषार जोशी, नागपूर
.