रविवार, ३ जून, २०१२

उड जा पुढे

धमन्यातून सळसळ रक्त नवे
चैतन्यच अंकुरले हिरवे
अंधार कधीचा फिटला हो
ध्येयाचा चेहरा दिसला हो
भिड जा पुढे
भिड तू रे गड्या
उड जा पुढे
उड तू रे गड्या

आला जर पर्वत तर त्याला
शक्ती आहे सर करण्याची
वर चढण्याची युक्ती लावू
अथवा त्याला पोखरण्याची
भय कसले संशय कुठला हो
निश्चय जाहिर सांगितला हो
चढ जा पुढे
चढ तू रे गड्या
उड जा पुढे
उड तू रे गड्या

करकचून ताणू जिद्दीला
दणदणून सोडू जगताला
चंद्राची माथ्यावर बिंदी
केसातुन माळू सूर्याला
प्रयत्नाचा गुण पटला हो
अंगात यशोज्वर ऊठला हो
लढ जा पुढे
लढ तू रे गड्या
उड जा पुढे
उड तू रे गड्या

तुषार जोशी, नागपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: