बुधवार, १९ डिसेंबर, २०१२

दुःखाची योजना

खरे लोकं हरत नसतात
मग मी का हरले? असे वाटते का?
बाप्पा सगळे वरून बघतात
मी का फसले? मनास जाचते का?

आपल्या आयुष्यात दुःख असतात
विश्वासघात असतात काही
ते सगळे आपल्यापर्यंत पाठवायला
बाप्पाला लागतात भारवाही
मग आपल्याच आसपासची माणसे
त्याचे माध्यम बनतात
ते वाईट नसतात दुष्ट नसतात
ते तर माध्यम असतात
तावून सुलाखून प्रगल्भ कणखर
त्या वेदना करतात कळले का?

आपण बघतो फक्त वेदना आणि
म्हणतो मलाच त्या कशाला
आपलं नशीबच वाईट समजतो
आणि जाळत बसतो स्वतःला
स्वतःला समजावले पाहिजे
आयुष्य अजून संपलेले नाही
बाप्पाने याहूनही उदात्त असे
आपल्यासाठी ठेवलेय काही
सुख समजण्यासाठी कदाचित
दुःखाची योजना असते का?

आपण रूसून बसू नये मुळी
आपण मनापासूनच जगावं
येणाऱ्या आपल्या सुखासाठी मनाला
निराशेपासून अगदी दूर ठेवावं
बाप्पावरचा विश्वास मावळू नये
याची नेहमी काळजी घ्यावी
त्याच्यावरचा विश्वास त्याला सांगायला
मधे मधे त्याला भेट द्यावी
त्यानेच आयुष्य दिलेल तेव्हा तोच
सर्व काही देईल पटते का?

~ तुष्की
नागपूर, १९ डिसेंबर २०१२, ०९:३०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: