रविवार, १ जुलै, २०१२

दागिना

आईच्या पदरा समान दुसरा आधार आहे कुठे
मायेचे धन लाभता धन गडी प्रासाद सारे थिटे
आईला बिलगून दूर पळते भीती कुठेच्या कुठे
आईगं म्हणताच शल्य विरते तृष्णा युगांची मिटे

बाबाच्या भवती घरात फिरणे याची मजा वेगळी
हट्टाला पुरवून रोज करतो साकार माझी खळी
रागाने वर पाहतो सहज मी खोडी कधी काढता
लाडाने समजावुनी शिकवतो अभ्यास ना त्रासता

मागावे तर काय सर्व जिनसा आधी मला लाभती 
आजारी पडता उशास बसती दोघेच ते जागती
मागा देइन प्राण, मात्र प्रिय मी हे छत्र देईन ना
भाग्याने असती महान सगळे ज्यांचा असा दागिना

हे सारे धन आठवून कसली ही वेदना सारखी?
सामोरी तर आश्रमात सगळी आई विना पोरकी

तुषार जोशी, नागपूर
+९१ ९८२२२ २०३६५
०१ जुलै २०१२, १२:००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: