सोमवार, ८ डिसेंबर, २०१४

काच

.
माझ्या बाईकच्या
मागच्या सीट वर बसून
मला घट्ट बिलगली होतीस
तेव्हाच..
एक अनामिक नातं
वेगवान वाऱ्यावर लिहिलं होतंस
.
परिस्थितीच्या काचेवर
एकाबाजूने मी हात ठेवताच
दुसऱ्याबाजूने तू
बोटाला बोट मिळवून हात ठेवला होतास
पाणीदार डोळ्यातून
किती बोलली होतीस
तेव्हाच एक धागा विणला गेलेला
त्या काचेच्याही आरपार
.
कीतीदातरी
प्रत्यक्ष आणि फोनवरही
निशब्दातच..
बोललीस माझ्याजवळ
तेव्हा
त्याच नात्यामुळे
त्याच धाग्यामुळे
सहज पोहोचलीस खोल मनात
तुला कळतच असेल, हो ना?
.
(देवाशिषच्या कविता, तुष्की, नागपूर)
१२ एप्रिल २०१४, ०५:००
+९१ ९८२२२ २०३६५


शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०१४

सख्या सजणा

तुझ्या नजर मिठीत, ऊब हिवाळी उन्हाची
तुझी ऊब पांघरावी, भीड नकोच जगाची
.
तुझे रोखून बघणे, काळजाचे करे पाणी
तुला बघावे वाटते, पण बघेल का कोणी?
.
झुकवते पाणण्यांना, अशी लाज वाटू येते
माझे मनातले सारे, तुला कळेल कधी ते?
.
तुला पाहिल्या पासून, जग तुझे तुझे सारे
लपवुन ठेवलेले, बघ तुझे तुझे सारे
.
बघ तुझे तुझे सारे, जपलेले किती वर्ष
आसुसली शबरी ही, कधी होई राम स्पर्ष
.
तुझी पाहून भरारी, मला वाटते कौतुक
तुझ्या मनात रहावे, इतकीच इच्छा एक
.
इतकीच इच्छा एक, माझ्या भाबड्या मनाची
तुझ्या नजर मिठीत, ऊब हिवाळी उन्हाची
.
तुष्की नागपुरी
नागपूर, १७ ऑक्टोबर २०१४, १५:००

सोमवार, २९ सप्टेंबर, २०१४

झील

तूम फूल हो तुम बाग हो
तुम हो बलाकी जादूगर
तुम धूप हो तुम छाँव हो
तुम झील हो तुम्ही सागर
.
तुम जुल्फ की घनी रातें
तुम मुस्कराता उजियारा
तुम खुशबू पहले बारिश की
तुमको देखे वो दिल हारा
.
तुम हुस्न का नया परचम
तुम हो बलाकी अलबेली
नाराज़ फरिश्ते फिरते हैं
उनकी अदा तुमने ले ली
.
तुष्की नागपुरी
नागपूर, २६ सप्टेंबर २०१४, २३:३०

शुक्रवार, २५ एप्रिल, २०१४

तुझी आठवण....

तुझी आठवण येते
कासाविस होतो जीव
तुझ्या निर्व्याज प्रेमाची
क्षणाक्षणाला जाणीव
.
तुझी आठवण येते
घर टाकताच मागे
पुन्हा परत येण्याचे
वेध निघताच लागे
.
तुझी आठवण येते
श्वासा श्वासाला सदैव
जरी क्रमप्राप्त मला
लागे कामावर जावं
.
तुझी आठवण येते
तीच मला बळ देते
माझ्या दिवसाचा ताण
सहज शोषून घेते
.
~ तुष्की,
वाशिंग्टन, २५ एप्रिल २०१४, ०४:००

बुधवार, १६ एप्रिल, २०१४

प्रभाव

पाणी वाहतच जाते, त्याला अडवले तरी
त्याला जागा मिळताच, पुन्हा वाहत जाई
त्याचा स्वभाव कधिही, विसरत नाही पाणी
कोणी काही केले त्याचा, विरस होत नाही
.
पाण्यासारखा असावा, माझा अटळ निर्धार
परिस्थितीला शरण, स्वभाव नको माझा
माझा प्रभाव असावा, उत्तरात रमणारा
समस्याच मांडणारा, प्रभाव नको माझा
.
माझा स्वभाव असावा, सदा प्रकाश देण्याचा
किती अंधार आहे हे, कधी मी पाहू नये
कृती कृतीत असावे, मूळ तत्वांचेच भान
माझी कृती भावनेच्या, आहारी जाऊ नये
.
नको प्रभाव कुणाच्या, खूप प्रेम करण्याचा
नको द्वेषाचा असर, माझ्या वागण्या वर
माझ्या हातून घडावे, जे जे बरोबर आहे
जग फुलूनिया यावे, जिथे घडे वावर
.
~ तुष्की,
वाशिंग्टन, १६ एप्रिल २०१४, ०६:००

काटा रूतलाय खोल

काटा रूतलाय खोल
जरी मागितला नाही
काटा रूतलाय जरी
माझा काही दोष नाही

काटा रूतलाय खोल
चालणेच झाला दोष
मला भुलावत होते
पाना फुलांचे आमिष

काटा रूतलाय खोल
वाटे निघू नये आता
आत राहूनही त्रास
जीव जाईल निघता

काटा रूतलाय खोल
म्हणूनच मी जागतो
माझ्या मागून येणाऱ्या
साठी फुले मी मांडतो

काटा रूतलाय खोल
कदाचित याच साठी
वेदनेतून फुलावी
अमृताची गाणी ओठी

~ तुष्की,
वाशिंग्टन, १६ एप्रिल २०१४, ०४:००

बुधवार, ९ एप्रिल, २०१४

सागर

जेव्हा आपले श्वास
परस्पर गुंतले होते
आणि ओठ बुडाले होते
अनामिक सोहळ्यात
जेव्हा वेळ थांबून गेली होती
भान हरवलेले होते
बोटे अडकली होती
घनदाट केसांच्या जाळीत
मला सांग
तेव्हाचे माझे तुझे अस्तित्व
वेगळे काढता येईल का?
ते तर अद्वैत होते
माझ्याही पलिकडले
तुझ्याही पलिकडले
ते एक वेगळेच
अस्तित्व होते
आवेग ओसरल्यावर
ती पावसाची सर होती असे वाटतेय
आपण एकमेकांकडे चिंब भिजल्या नजरेने
बघतोय..
आणि पुन्हा
ते स्वतंत्र अस्तित्व सहन न होऊन
पुन्हा आवेग होतोय
एकमेकात मिसळून जाण्यासाठी
कायमचे...
नदी सागरासारखे
तुला एक सांगू
सागराला आपण कधी एकटे पाहिलेलेच नाही
हे जे दिसते ते तर
नदीशी एक झाल्यावर जन्मलेले
त्याचे नवे अस्तित्व आहे बघ!

~ तुष्की, नागपूर
०९ एप्रिल २०१४, ०७:४५
वर्नान हिल्स

बुधवार, २२ जानेवारी, २०१४

आलं पाहिजे

डोंगर होता आलं पाहिजे
पाय जमिनित घट्ट रोवून
येणाऱ्या प्रत्येक वादळाला
आव्हान देता आलं पाहिजे
डोंगर होता आलं पाहिजे

डोंगर होता आलं पाहिजे
जमिनिवर राहून देखिल
महत्वाकांक्षेचं बोट
ढगात नेता आलं पाहिजे
डोंगर होता आलं पाहिजे

डोंगर होता आलं पाहिजे
थकल्या भागल्या जीवाला
आश्वासक उब देत
कुशीत घेता आलं पाहिजे
डोंगर होता आलं पाहिजे

डोंगर होता आलं पाहिजे
पावसाला अंगाखांद्यावर
खेळवून सागराकडे
सोडून येता आलं पाहिजे
डोंगर होता आलं पाहिजे

~ तुष्की
नागपूर, २२ जानेवारी २०१४, ००:३०