बुधवार, ६ जून, २०१२

वादळे

वेड्यापिश्या झुंझारतेने रोखली मी वादळे
पेल्यात माझ्या दाटलेली झोकली मी वादळे

आम्ही फुलांचे स्वप्न नाही पाहिले ऐसे नव्हे
नाही कधी जुळले फुलांशी, माळली मी वादळे

काहीतरी देऊन जावे मागणी झाली जिथे
माझ्याकडे खेळायची ती सोडली मी वादळे

व्हावी तशी आरास काही होईना मांडू कशी
हातातली आताच सगळी ओतली मी वादळे

झोपायला जमतेच ना स्वप्ने कशी पाहू तुझी
कंटाळुनी आता उशाला आणली मी वादळे

तुषार जोशी, नागपूर
२० एप्रिल २०११, ०८:३०

1 टिप्पणी:

  1. गझल आवडली

    "आम्ही फुलांचे स्वप्न नाही पाहिले ऐसे नव्हे..."
    पाटणकरांची आठवण आली एकदम !

    उत्तर द्याहटवा

ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: