बुधवार, १८ जुलै, २०१२

रीत

संध्याकाळी ताजे
गुलाब घ्यावे म्हणतो.
तिच्या कुरळ बटांना
हळुच सजवावे म्हणतो
.
छोट्यासाठी लुडो
घेऊनच आलो आज
देईन आणि बघेन
त्याचा हर्षित नाच
.
धडाम वाजले काय
जाणवत नाही पाय.
आई, बाबा, माझी मनू
जन्म आठवला जणू
.
लोकल झाली माती
कितेक स्वप्ने मिटली.
हे जीवन संपवण्याची
तुझी रीत रे कुठली?
.
तुषार जोशी, नागपूर
२८ नोव्हेंबर २००७
+९१ ९८२२२ २०३६५

मंगळवार, १७ जुलै, २०१२

दुसरं प्रेम - २

माझ्या पहिल्या प्रेमाचे
पाहतो दुसरे प्रेम
किती यातना जिवाला
नियतीचा नाही नेम

अपघात झाल्यावर
कुणा सापडलो नाही
नव्हतीच किती दिस
आठवण कुणाचीही

आता आठवता सारे
बघा आभाळ फाटले
तिला तरूण देखणे
प्रेम दिसते भेटले

वाटे तिचा दोष काय
नियतीच करे खेळ
तिच्यावर कशासाठी
आणा परिक्षेची वेळ

सुखी रहा सखे राणी
देतो आशिष दुरून
जगेन मी आठवणी
जुन्या काळच्या स्मरून

तुषार जोशी, नागपूर
+९१ ९८२२२ २०३६५
१६ जुलै २०१२, २३:३०

दुसरं प्रेम

"माझं तुझ्यावर प्रेम आहे"
म्हणल्यावर लगेच म्हणाला
पण माझं लग्न आहे झालेलं.
"कंप्युटर" नावाच्या सवतीबरोबर
नांदायला तयार असशील
तर माझं हृदय मी कधिचं
आहे तुला दिलेलं.

हो म्हणून हसले
आणि… त्याचं
(दुसरं तं) दुसरं प्रेम
होऊन त्याची होऊन बसले.

तिच्याजवळ असला
की माझ्याकडे तो पाहतही नाही
तासंतास तिच्याशी
गप्पा मारण्यात सगळा वेळ जाई
माझ्याकुशीतून निघताच
सकाळी तिच्याकडे घेतो धाव
तरीही मला ही सवत
चालून जाते राव

ती फक्त वेळ मागते
हृदय मागत नाही
दुसरं प्रेम तर दुसरं पण
हृदयाने तर तो माझाच राही

तुषार जोशी, नागपूर
+९१ ९८२२२ २०३६५
१६ जुलै २०१२, २३:००

रविवार, १५ जुलै, २०१२

तुझ्या चांदण्याने

तू हसतेस आणि भरतेस
घराला तुझ्या चांदण्याने
तू उरतेस स्मरण होऊन
क्षणाक्षणाने कणाकणाने

तू बघतेस तुझ्या टपोऱ्या डोळ्यानी
चष्म्याच्या पारदर्षक काचांतून
माझ्यासाठी कवच ठरतेस सोडवतेस
मला जगाच्या खोचक जाचांतून
तुझे असणेच आश्वासन ठरते
जगण्याचे औषधा प्रमाणे

तू बसतेस जिथे टेकवतेस डोके
त्या जागा होतात माझे देव्हारे
तू नसतानाही त्या जागा असतात
माझे विसावण्याचे शांत किनारे
तुझ्या केसांचा गंध भेटतो
मला सुखाच्या अत्तराप्रमाणे

तुषार जोशी, नागपूर
+९१ ९८२२२ २०३६५
१५ जुलै २०१२, १२:५०

शुक्रवार, १३ जुलै, २०१२

तहान

तू अचानक म्हणालीस..
ए..
तुझी ती वाली कविता ऐकव ना
ती 'येतेस' वाली
माझ्या चेहऱ्यावर
अगणीत सूर्यांची झळाळी आली
एक झाल्यावर तुला दुसरी आठवली
मग तिसरी
आणि मी कितीतरी दिवसांनी
माझ्याच कवितांच्या आनंदात बुडलो
कवितांच्या अथांग आकाशात
तुझ्याबरोबर मनसोक्त उडलो
सुख फक्त कविता माझ्या हे नव्हते
त्या तुला फर्माईश करून
आवर्जून ऐकायच्या होत्या हे होते
जगाच्या रहाटगाडग्यात
आता कळतेय मी
किती रखडलेला होतो
अशी तृप्ती मिळाल्यावर कळले
किती दिवसांपासून मी…
तहानलेला होतो

तुषार जोशी, नागपूर
+९१ ९८२२२ २०३६५
१३ जुलै २०१२, २३:००

बुधवार, ११ जुलै, २०१२

भार झाला

जन्मतांच घरच्यांचे तोंड कडू
तास तास एकटीला देती रडू
मुलगी असणे असे तिचा दोष
साहते बिचारी सगळ्यांचा द्वेष
रडताना रडण्याचा वीट आला
पापण्यांना आसवांचा भार झाला

गोड धोड पण वाटलेच नाही
म्हणती जन्माला आली कशाला ही
मुलगा असता तं हवा होता
हुंडा जमवावा लागणार आता
अवकळा आली सगळ्या घराला
पापण्यांना आसवांचा भार झाला

जन्माला आली आहे ती जगेल
हळू हळू तिला प्रश्न पडतील
माझा काय दोष सांगा ती म्हणेल
कुणापाशी नीट उत्तर नसेल
निरागस असताना कष्ट तिला
पापण्यांना आसवांचा भार झाला

समाजाची रीत बदलावी कशी
निभवावी लागते जशिच्या तशी
वेगळे केले तं काळे फासतील
जिथे तिथे अडवून जाचतील
जगणे शरण त्या प्रवाहाला
पापण्यांना आसवांचा भार झाला

तुषार जोशी, नागपूर
११ नोव्हेंबर २०१०, २०:००
+९१ ९८२२२ २०३६५

अब समय मेरा है

अब समय मेरा है
कुछ भी कर सकता हूँ मैं, ये दावा सुनहरा है
अब समय मेरा है

मुसिबतों का डर नहीं चीरता चलूँगा मैं
आँधीयों के बाद भी यहीं खडा मिलूँगा मैं
मै चमकता सितारा हूँ जो अंधेरा घनेरा है
अब समय मेरा है

ये जग भर दूँगा मैं प्यार से विश्वास से
पिता सवाँरता है बच्चों की जिंदगी जैसे
सबको साथ रखने वाली मेरी विचारधारा है
अब समय मेरा है

तुषार जोशी, नागपुर
+९१ ९८२२२ २०३६५

गुरुवार, ५ जुलै, २०१२

गुन्हा

गोड मुलीशी ओळख केली
झाला एवढाच गुन्हा
सुचला कसा कुणास ठाऊक
असला शहाणपणा
.
एकटेपणा, कंटाळा हे
मित्र झाले परके
वाईट्ट मेले चांगले विचार
जवळ येतात सारखे
.
थोडं काही चुकलं तर
शिक्षा आहे ठरलेली
गोड बोलणी खावी लागतात
साखरेत बुडवलेली
.
पोरकेपणाची चांगली भावना
गेली मला सोडून
दुष्ट प्रेम ममता यांच्यात
गेलो पार बुडून
.
भुतासारखा मानगुटीवर
बसलाय बघा गुन्हा
इतकं झालं तरी करावा
वाटतो पुन्हा पुन्हा
.
तुषार जोशी, नागपूर
१७ फेब्रूवारी १९९७
+९१ ९८२२२ २०३६५

एक वादळ कधीचे

एक वादळ कधीचे
माझ्या अंतरात आहे
माझे शांत दिसण्याचे
वेड अतोनात आहे

किती धडपड धडपड
बाहेर येण्याची
माझी तारांबळ तारांबळ
येऊ न देण्याची
असे जळत जगणे
किती नशिबात आहे?
एक वादळ कधीचे
माझ्या अंतरात आहे

जग आनंद आनंद
कसे मोहर आलेले
कसे बोलू मनातले
मन वादळ झालेले
शांत निर्मळ जगाचा
काय अपराध आहे?
एक वादळ कधीचे
माझ्या अंतरात आहे

तुषार जोशी, नागपूर
+९१ ९८२२२ २०३६५

बुधवार, ४ जुलै, २०१२

व्यापार

सांगण्या साठी स्वतःचे जो दिसे, तैयार आहे
ऐकण्याची वेळ येता बंद पक्के दार आहे

आबरू ईमान प्रीती स्वस्त यांचे भाव झाले
चौकचौकातून चालू जाहला व्यापार आहे

बंगला नाही नसूद्या बांधुया केव्हातरी तो
तोवरी रस्त्यात साधा थाटला संसार आहे

तू इथे होतीस तेव्हा मी स्वतःतच गुंग होतो
आज तू नाहीस याला मीच जिम्मेदार आहे

जाणतो मी मद्य घेता जीवनाचा नाश होतो
वेदनेला घालवाया केव्हढा आधार आहे

तुषार जोशी, नागपूर
+९१ ९८२२२ २०३६५

रविवार, १ जुलै, २०१२

दागिना

आईच्या पदरा समान दुसरा आधार आहे कुठे
मायेचे धन लाभता धन गडी प्रासाद सारे थिटे
आईला बिलगून दूर पळते भीती कुठेच्या कुठे
आईगं म्हणताच शल्य विरते तृष्णा युगांची मिटे

बाबाच्या भवती घरात फिरणे याची मजा वेगळी
हट्टाला पुरवून रोज करतो साकार माझी खळी
रागाने वर पाहतो सहज मी खोडी कधी काढता
लाडाने समजावुनी शिकवतो अभ्यास ना त्रासता

मागावे तर काय सर्व जिनसा आधी मला लाभती 
आजारी पडता उशास बसती दोघेच ते जागती
मागा देइन प्राण, मात्र प्रिय मी हे छत्र देईन ना
भाग्याने असती महान सगळे ज्यांचा असा दागिना

हे सारे धन आठवून कसली ही वेदना सारखी?
सामोरी तर आश्रमात सगळी आई विना पोरकी

तुषार जोशी, नागपूर
+९१ ९८२२२ २०३६५
०१ जुलै २०१२, १२:००