गुरुवार, ७ जानेवारी, २०१०

या बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही

.

बाहेर जाताना विचारते कोणती साडी घालू
उत्तर देताच म्हणते घालू का हिरवाच शालू
आधीच ठरले होते तर विचारायचे कशाला?
कोणतीही घाल म्हणायची सोय नाही बिचाऱ्याला
तसे म्हटले तर नको तेव्हा रूसून बसणार बाई
या बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही

ही गाडी चालवणार तेव्हा मी डोळे मिटतो
हिला इतर गाड्यांचा अफाट अंदाज असतो
कुठेही ब्रेक लावते कुठेही शहनाई हार्नची
डेंटींग पेन्टींगनेच होते सांगता महिन्याची
हवे तसे वळणावर कधीच वळत नाही
या बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही

आउच्या काऊचे काहीतरी उगाच सांगत बसते
टिव्ही सिरियलच्या प्रसंगांवर हसते रडते
या कानातून त्या कानात केले तर येतो राग
ऐकण्याचे नाटक केले तर तेही पडते महाग
यांना दया म्हणूनही जरा शांत राहता येत नाही
या बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही

तुषार जोशी, नागपूर