रविवार, १४ मार्च, २०१०

माकड

.

माझे मन म्हणजे,
मुळात एक माकड आहे
याला ताळ्यावर ठेवणे
फार फार अवघड आहे

शहाणपणाचा सुबक
सोनेरी मुकुट घालतं ते
शिस्तीची काठी घेउन
ऐटीमध्ये चालतं ते

लोकांनी हसू नये
म्हणून सगळे नियम पाळतं
गळ्याभोवती प्रगल्भतेचा
पांढरा स्कार्फ घालतं

अनुभवाचा पिवळा झगा
घालून फिरतं सदैव
याला नेहमीच माकडपण
याचं लपवायला हवं

पण हे सगळ बाहेर
आतून उड्या मारतं
मलाच ठाऊक मला काय
सहन करावं लागतं

बायकोबरोबर शॉपिंग
साळसूद नवरा मी
हे म्हणतं वा काय सेल्सगर्ल
हाय झालो जखमी

बॉस कडे देतो मी
लक्ष मिटींग मधे
हे विचारतं ओरडू का
याहूयाहू मधे मधे

रस्त्यावरचा तमाशा
मी म्हणतो वगळून जाऊ
हे नाचतं पुढे मागे
म्हणतं फक्त एकदाच पाहू

मी याचे ऐकत नाही
घरा बाहेर असता कधी
आरश्यासमोर येताच मिळते
याला समोर यायची संधी

मुकुट, छडी, स्कार्फ
आणि त्याचा पिवळा झगा
काढून ठेवतं आरश्या समोर
मग गोलगोल घालतं पिंगा

मन भर माकड चेष्टा
थयथय उड्या बेभान मारतं
निमूटपणे नंतर येऊन
मुकुट छडी झगा मागतं

तुषार जोशी, नागपूर
३० जानेवारी २०१०

.