बुधवार, १० जून, २००९

चितचोर

अाले वयात वयात
झाली सुगंधी चाहूल
प्रीती कथा कवितांची
पडे काळजाला भूल - १
-
नवे कॉलेज कॉलेज
नव्या मैत्रिची पालवी
मन म्हणे बागडावे
लाज नेमके अडवी - २
-
कसा लबाड अारसा
रूप सुंदर दाखवी
वाटे स्वतःचीच छबी
पुन्हा पुन्हा निरखावी - ३
-
अाला हसत हसत
राजबिंडा चितचोर
वर्गामध्ये नेमका तो
बसे माझ्याच समोर - ४
-
त्याचे दिसणे सोज्वळ
हसताना खळी गाली
नकळत बोलताना
माझ्या गाली येते लाली - ५
-
मन म्हणते ग वेडे
अशी गुंतू नको बाई
अाजकाल नाही कुठे
भरवसा कुणाचाही - ६
-
होता नजरा नजर
धडधड ह्रदयात
डोळ्यातून निसटते
अाणले ना जे शब्दात - ७
-
घरी जाताना एकदा
म्हणाला तो अडवून
मन कशात लागेना
अावडते तू म्हणून - ८
-
झाले लाजून मी चूर
काय करू कुठे जाऊ
गगनातही मावेना
अानंदाला कुठे ठेऊ - ९
-
छोटी ला मीठी घालून
गरा गरा फिरवले
झोपी जाताना उशीच्या
घट्ट कुशीत शिरले - १०
-
झोप लागेना उडाली
छोटी ला काही कळेना
ताई कशी करते ग?
विचारते पुन्हा पुन्हा - ११
-
कॉलेजातले सोनेरी
दिस सरले पाहता
एक त्याचे माझे विश्व
वेगळाले न राहता - १२
-
बोलावले खास जेव्हा
बागेमद्ध्ये अाज त्याने
विनाकारण अडला
श्वास उगाच शंकेने - १३
-
अाई बाबांचा नकार
तेव्हा त्याने सांगितला
फूल तोडताना काटा
खोलवर गं रूतला - १४
-
किती रडले रडले
काही उपाय सुचेना
वडिलांच्या इच्छेविण
पाऊलही टाकवेना - १५
-
घरी पोचले हरून
निराश मी उदास मी
तुझे लग्न ठरवले
दिली छोटी ने बातमी - १६
-
माझ्या ह्रदयाचा कोणी
इथे विचार करेना
नको नको ते मिळते
हवे हवे ते मिळेना - १७
-
म्हणे घातली मागणी
लग्न पण ठरवले
अाई बाबा तुम्ही सुद्धा
मला नाही विचारले - १८
-
फोटो बघून मुलाचा
पण अाले भानावर
अग बाई हातं माझा
राजबिंडा चितचोर - १९
-
किती दुष्ट अाहे मेला
किती छळले ना त्याने
एका मागणीत केले
पण अायुष्याचे सोने - २०
-
तुषार जोशी, नागपूर
(०९ जून २००९)

८ टिप्पण्या:

  1. एकदम आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी च्या तालावर म्हणण्याची कविता वाटली

    उत्तर द्याहटवा

ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: